

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ करा, प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लावा तसेच अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची कायम नियुक्ती करावी, अशी मागणी महापौर रुपाराणी निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसरे जागतिक महापौर फोरम आणि आणि सातवे अशिया सिटीज समिट २०२६ या आंतरराष्ट्रीय परिषदेत कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम यांनी भाग घेतला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचे आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले विविध प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडून त्याबाबत निवेदन सादर केले.
अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांच्या सेवा कायम झाल्यास त्यांच्या सेवेला स्थैर्य मिळणार आहे. शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लागल्यास शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळणार आहे. तसेच झोपडपट्टीधारक व प्लॉटधारक नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध झाल्यास त्यांच्या मालमत्तेच्या हक्कांना अधिकृत स्वरूप प्राप्त होण्यास मदत होणार आहे, असे महापौर निकम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील या व्यासपीठावर सहभाग नोंदविताना महापौरांनी कोल्हापूरच्या विकासाशी निगडित महत्त्वपूर्ण प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रश्नांवर शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही महापौर निकम यांनी व्यक्त केली. शहराचा सर्वांगीण विकास करताना पायाभूत सुविधांसोबतच नागरिकांचे हक्क, सुरक्षितता आणि मूलभूत प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्याची भूमिका महापौरांनी या माध्यमातून मांडली आहे.