हेरिटेज कोल्हापूर निबंध स्पर्धेत प्रसाद काकडे प्रथम

कोल्हापूर : ‘हेरिटेज कोल्हापूर’ निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांसोबत डॉ. संदीप पाटील, प्रा. डॉ. जे. के. पवार, उदय पाटील, प्राचार्य डॉ. अरुण पौडमल, गणेशकुमार खोडके आदी.  		        (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर : ‘हेरिटेज कोल्हापूर’ निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांसोबत डॉ. संदीप पाटील, प्रा. डॉ. जे. के. पवार, उदय पाटील, प्राचार्य डॉ. अरुण पौडमल, गणेशकुमार खोडके आदी. (छाया : पप्पू अत्तार)

दैनिक 'पुढारी' संचलित प्रयोग सोशल फाऊंडेशनच्या वतीने 'वारसा सप्‍ताहा'निमित्त ' हेरिटेज कोल्हापूर ' या विषयावरील निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात पन्हाळा तालुक्यातील प्रसाद काकडे याने प्रथम क्रमांक पटकाविला. दुसरा क्रमांक शाहूवाडी तालुक्यातील कोमल रेडेकर हिने तर तृतीय क्रमांक गगनबावडा तालुक्यातील विद्या डाकवे हिने मिळविला.

गोमटेश इंग्लिश मेडियम स्कूल, निपाणी व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, कोल्हापूर (के.एम.सी. कॉलेज) यांच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित केला होता. यामध्ये जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. 'करवीर संस्थापिका रणरागिणी ताराराणी', 'राजर्षी शाहू महाराज यांचा सामाजिक द‍ृष्टिकोन', 'ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन', 'कलापूर व क्रीडानगरी कोल्हापूर', 'निसर्गसंपन्‍न कोल्हापूर व जैवविविधता' या विषयांवर ही निबंध स्पर्धा झाली. बक्षीस वितरणाने 'हेरिटेज सप्‍ताह' उपक्रमांची सांगता गुरुवारी झाली.

बक्षीस समारंभ डॉ. संदीप पाटील, गोमटेश विद्यापीठाचे संचालक उदय पाटील, 'के.एम.सी.' कॉलेजचे प्राचार्य डॉ. अरुण पौडमल यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक इतिहास अभ्यासक व लेखक प्राचार्य डॉ. जे. के. पवार, दै. 'पुढारी'चे पुरवणी संपादक जयसिंग पाटील, पुराभिलेखाधिकारी गणेशकुमार खोडके यांच्या हस्ते झाला. यावेळी प्राचार्या ज्योती हरदी, स्वाती चव्हाण, प्रत्यय पाटील, प्रा. डॉ. प्रशांत नागांवकर, प्रा. डॉ. संजय कांबळे, महेंद्र कुलकर्णी, सर्जेराव चिले, अतुल कुंभार यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. 'स्वराज्य संकल्पक' जिजाऊ यांच्या पुतळ्यास अभिवादनाने उपक्रमाची सांगता झाली.

दै. 'पुढारी' चालते-बोलते विद्यापीठ : डॉ. पाटील

शतकाकडे वाटचाल करणारे दै. 'पुढारी' चालते-बोलते विद्यापीठ आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना लिहिते करण्यासाठी आयोजित स्पर्धा भविष्याच्या द‍ृष्टीने वारसा जपणुकीसाठी उपयोगी ठरेल, असा विश्‍वास डॉ. संदीप पाटील यांनी मार्गदर्शनात व्यक्‍त केला. राजर्षी छत्रपती शाहूंचा लोकशिक्षणाचा वारसा निपाणी येथील गोमटेश विद्यापीठ संस्थेने जपला असून, या कार्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.

प्रत्येक तालुक्यातून निबंधाची निवड

प्रत्येक तालुक्यातून एका उत्कृष्ट निबंधाची निवड अंतिम फेरीसाठी केली होती. या निवडक विद्यार्थ्यांची मुलाखत परीक्षक डॉ. जे. के. पवार, जयसिंग पाटील व गणेशकुमार खोडके यांनी घेतली. यातून प्रथम – प्रसाद काकडे (छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेज, संजीवन – पन्हाळा), द्वितीय – कोमल रेडेकर (डॉ. एन. डी. पाटील कॉलेज, मलकापूर – शाहूवाडी), तृतीय – विद्या डाकवे (पुढारीकार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा) यांनी यश मिळविले.

याशिवाय उत्तेजनार्थ : मानसी अब्दागिरे (अण्णासाहेब डांगे कॉलेज, हातकणंगले), शुभांगी सुतार (आर्टस्-कॉमर्स कॉलेज कोवाड, चंदगड), सादिया नाईकवडी (सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर), दीपाली खाडे (स. ब. खाडे कॉलेज, कोपार्डे-करवीर), उत्कर्षा डाकरे (कर्मवीर हिरे कॉलेज गारगोटी, भुदरगड), चारुदत्त माळी (एस. के. पाटील कॉलेज कुरुंदवाड, शिरोळ), ऋतुजा रेडेकर (दूधसागर कॉलेज बिद्री, कागल), किशोर पोवार (आजरा कॉलेज, आजरा), तेजस्विनी संकपाळ (डॉ. घाळी कॉलेज, गडहिंग्लज), निशिगंधा पाटील (पार्वतीबाई मोरे कॉलेज सरवडे, राधानगरी) या विद्यार्थ्यांचा समावेश होता. सर्वांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आकर्षक पुतळा, प्रा. डॉ.जे. के. पवार लिखित 'बालकल्याणाचे प्रणेते-राजर्षी शाहू' पुस्तक, स्मृतिचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. शिवाय सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र महाविद्यालयात दिले जाईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news