क्षयरोगावरील प्रभावी लस लवकरच

क्षयरोगावरील प्रभावी लस लवकरच

कोल्हापूर : देशात पहिल्यावहिल्या भारतीय बनावटीच्या कोरोनावरील कोव्हॅक्सिन आणि नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक या लसींची यशस्वी निर्मिती केली. या लसींद्वारे तमाम भारतीयांसह जगाला दिलासा देणार्‍या भारत बायोटेकने आता क्षयरोगाला हद्दपार करण्यासाठी कंबर कसली आहे. क्षयरोगावरील या जगातील सर्वात प्रगत लसीच्या निर्मितीची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. या लसीच्या माध्यमातून क्षयरोगाच्या संसर्गाचा प्रसार रोखण्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या लसीचे बाजारात यशस्वी आगमन झाले, तर पोलिओप्रमाणे क्षयरोगाला (टीबी) जगातून हद्दपार करण्याची गुरूकिल्ली हातात येऊ शकते.

भारत बायोटेकचे कार्यकारी अध्यक्ष कृष्णा ईला यांनी एका इंग्रजी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही माहिती पुढे आली आहे. कंपनीने या लसनिर्मितीसाठी एका स्पॅनिश कंपनीबरोबर तांत्रिक सहकार्य घेतले आहे. त्यांच्या सहयोगातून निर्माण झालेल्या या लसीच्या पहिल्या व दुसर्‍या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या असून दक्षिण आफ्रिकेमध्ये तिसर्‍या टप्प्यातील चाचण्यांना प्रारंभ होतो आहे.

प्रसार थांबवण्याचे प्रमुख उद्दिष्ट

भारतात अशा पद्धतीने बनविलेल्या देवीवरील बीसीजी लसीचा मोठा उपयोग झाला होता. सध्या जगभरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आधुनिक बीसीजी लस बनविली जात असली, तरी क्षयरोगावर बनविण्यात येणारी लस यापेक्षा वेगळी आहे. यामध्ये क्षयरोगाच्या संसर्गाचा प्रसार थांबविण्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या प्रसाराविषयीचा ज्ञात पुरावा अद्याप उपलब्ध नाही. यामुळेच यामध्ये आयसीएमआर महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी आशा आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news