

नानीबाई चिखली; भाऊसाहेब सकट : शिक्षण विभागातील काही योजना अजूनही प्रभावीपणे तळापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. म्हणून पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी शिक्षण संचालनालयाने कालबद्ध कृती कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी 'जागर' हा उपक्रम शाळांमध्ये राबविला जाणार आहे.
राज्य सरकारने प्राथमिक विभागातील नऊ, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील 24 आणि अल्पसंख्याक प्रौढ शिक्षण संचालनालयाकडील 7 अशा एकूण 40 योजनांचे एकत्रीकरण करून शिक्षण संचालनालय योजनांची पुनर्रचना केली. त्यांच्या योजनांचा पात्र विद्यार्थ्यांना लाभ मिळावा म्हणून योजना संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर, सहसंचालक अनिता कडू, उपसंचालक राजेश क्षीरसागर, परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी सर्व अधिकार्यांना प्रशिक्षण व सूचना दिल्या आहेत. जिल्हास्तरावर सर्व माध्यमिक मुख्याध्यापकांच्या मेअखेर किंवा 17 जूनला कार्यशाळा होईल. तालुका स्तरावर प्राथमिक मुख्याध्यापकांची कार्यशाळा 1 जुलै रोजी होईल. तत्पूर्वी, शाळास्तरावर शिक्षक-पालक सभा जूनअखेर घ्यायच्या आहेत. त्यात पालकांना सविस्तर माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे. तसेच विविध योजनांसाठी लागणार्या कागदपत्रांची माहितीही देण्यात येणार आहे.
इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती, कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खुली व आर्थिकद़ृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, संस्कृत शिष्यवृत्ती, माध्यमिक मुलींना प्रोत्साहन भत्ता, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती, दिव्यांग कल्याण शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक संस्था व शाळांसाठी पायाभूत विकास, मदरशांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण, मराठी भाषा फाऊंडेशन, बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती, साक्षर भारत आणि नव भारत साक्षरता कार्यक्रम यासह इतर योजनांचा यामध्ये समावेश आहे.
विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण विभागाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हा मुख्य उद्देश ठेवून 'जागर' उपक्रम राबविला जाणार आहे. त्यासाठी विभागाकडून नियोजनबद्ध कार्यक्रम आखला असून त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाणार आहे.
– महेश पालकर, संचालक, योजना संचालनालय