Dr. Smita Jadhav : राजर्षी शाहूंचा लोककल्याणाचा वारसा पुढे नेण्यासाठी डॉ. स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांना विजयी करा

समरजित घाटगे यांचे कागलमधील पदवीधर-शिक्षक मेळाव्यात आवाहन
Dr. Smita Jadhav : राजर्षी शाहूंचा लोककल्याणाचा वारसा पुढे नेण्यासाठी डॉ. स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांना विजयी करा
Published on: 
Updated on: 

कागल : लोककल्याणकारी राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची कागल ही जन्मभूमी, तर कोल्हापूर ही कर्मभूमी आहे. शाहू महाराजांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेला लोककल्याणाचा विचार कृतीतून पुढे नेण्याची क्षमता पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांना शाहू महाराजांच्या विचारांचे प्रतिनिधी म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असेे आवाहन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष व भाजपचे कोल्हापूर जिल्ह्यातील नेते समरजित घाटगे यांनी शनिवारी केले.

कागल येथे भाजप-महायुतीचे उमेदवार डॉ. स्मिता जाधव व कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ आयोजित पदवीधर व शिक्षकांच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

घाटगे म्हणाले, बऱ्याच वर्षांनंतर कोल्हापूरला पदवीधर आणि शिक्षक अशा दोन्ही मतदारसंघांत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. डॉ. स्मिता जाधव यांच्याकडे उत्तम कौशल्य, दूरदृष्टी आणि अभ्यासू वृत्ती आहे, तर कौस्तुभ गावडे यांना शिक्षकांच्या प्रश्नांची सखोल जाणीव आहे. दोन्ही उमेदवारांचे उच्च शिक्षण आणि अनुभव पदवीधर व शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरतील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानुसार या दोन्ही उमेदवारांची निवड झाली आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते त्यांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करतील. ‘पुढारी’ आणि विवेकानंद समूहाचे शाहू परिवाराशी जुने ऋणानुबंध आहेत. या परिवारांनी आपापल्या क्षेत्रांत आदर्शवत कार्य केले असून, हा वारसा पुढील पिढी समर्थपणे पुढे नेत आहे, ही अभिमानाची बाब आहे.

दैनिक ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक विजय जाधव म्हणाले, केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयात छत्रपती शाहू महाराज आणि सहकारमहर्षी राजे विक्रमसिंह घाटगे यांचा लोककल्याणकारी विचार कृतीतून पुढे नेणाऱ्या समरजित घाटगे यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. हाच लोककल्याणाचा वारसा डॉ. स्मिता जाधव पुढे नेत आहेत. ‘पुढारी’ परिवाराने विविध सामाजिक प्रश्न यशस्वीपणे हाताळले आहेत. या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी पुणे मतदारसंघातील मतदारांना मिळाली असून तिचे सोने करावे, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत खाडे म्हणाले, डॉ. स्मिता जाधव पदवीधरांच्या प्रश्नांसाठी, विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी प्रभावीपणे काम करतील. तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे ध्येय डॉ. जाधव यांच्यासमोर असून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याची क्षमता गावडे यांच्यात आहे. त्यामुळे या दोघांना विधान परिषदेत पाठविण्यासाठी पाठबळ द्यावे.

यावेळी श्रीराम साळुंखे, सांगावच्या सरपंच वीरश्री जाधव आणि विक्रम कोरवी यांनी मनोगत व्यक्त केले. ‘शाहू’चे संचालक सुनील मगदूम यांनी स्वागत केले. संचालक सचिन मगदूम यांनी आभार मानले. मेळाव्यास बाजार समितीचे माजी सभापती कृष्णात पाटील, भरत पाटील, पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा पाटील, कैलास जाधव, कागलचे उपनगराध्यक्ष जयवंत रावण, एकनाथ पाटील, प्रीतम कापसे, जनार्दन निऊंगरे, प्रतीक पाटील, महेश धुरे, श्रीकांत आरबुणे, सुरेश खोत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि पदवीधर व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news