.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
दत्तवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथे दूधगंगा नदीचे पाणी पात्रा बाहेर पडले असून नदीकाठची गवताची कुरणे बुडाले आहेत. त्यामुळे परिसरातील घोसरवाड दत्तवाड नवे व जुने दानवाड भागातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने दूधगंगा नदीवरील घोसरवाड-बोरगाव, दत्तवाड-एकसंबा, दत्तवाड-मलिकवाड ही महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणारे बंधारे गेल्या ३ ते ४ दिवसापासून पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. नागरिकांना सात ते आठ किलोमीटर लांब पल्याने वाहतूक करावी लागत आहे.
दतवाड परिसरातील मोठ्या प्रमाणात नागरिक शेती व शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहेत. अनेक शेतकरी व शेतमजुरांची पशुपालन हा उदरनिर्वाहाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. या जनावरांची चाऱ्याची गरज मोठ्या प्रमाणात नदीकाठच्या गवताच्या कुरणावर अवलंबून आहे. मात्र धरण क्षेत्रात सुरू असलेला जोरदार पाऊस व इतरत्र ही गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या संततदार पावसामुळे दूधगंगा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात वाढून गवताची कुरणे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे नागरिकांना चाऱ्याची गरज पूर्ण करण्यासाठी ऊसाचा हिरवा पाला तसेच पावसाळ्यापूर्वी साठवून ठेवलेला सुखा चारा तसेच बाजारात उपलब्ध असलेले कडबा कुट्टी, पेंड आदींवर अवलंबून राहावे लागत आहे.