पुणे : कौतुक सोहळ्याने भारावले कोल्हापूर, सांगलीचे डॉक्टर!

पुणे : कौतुक सोहळ्याने भारावले कोल्हापूर, सांगलीचे डॉक्टर!
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा : एरव्ही गळ्यात स्टेथेस्कोप, अंगावर पांढरा अ‍ॅप्रन… रुग्णांच्या तपासणीसाठी चाललेली लगबग… नातेवाईकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ… अशा परिस्थितीत दिसणारे डॉक्टर शुक्रवारी सुटाबुटात वावरताना, गप्पांमध्ये रमलेले पाहायला मिळाले. निमित्त होते दै. 'पुढारी'तर्फे आयोजित 'हेल्थ आयकॉन' पुरस्काराचे.

नगर रस्त्यावरील हॉटेल हयात येथे दै. 'पुढारी'तर्फे कोल्हापूर आणि सांगली येथील कर्तृत्ववान डॉक्टरांचा सन्मान सोहळा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पार पडला. ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी 'पुढारी'चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव, 'पुढारी'चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी व्यासपीठावर उपस्थित होते.

कोरोना काळात डॉक्टरांनी रुग्णांना अक्षरश: नवसंजीवनी दिली. स्वत:ची आणि कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाशी दोन हात केले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव 'पुढारी'च्या वतीने करण्यात आला. कायम गंभीर मानसिकतेत, गडबडीत असणारे, श्वास घ्यायलाही उसंत नसणार्‍या डॉक्टरांना पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने काही निवांत क्षण घालवता आले. नेहमीप्रमाणे त्यांचे फोन खणखणत नव्हते, त्यांच्याभोवतीच्या लोकांमध्ये भीतीचे, शंकेचे भाव नव्हते, तर सर्वांच्या डोळ्यांत त्यांच्याबद्दल कौतुकाचे भाव दिसत होते.

प्रकृती अस्वास्थ्य असूनही उपस्थिती

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, तसेच डॉ. के. एच. संचेती प्रकृती अस्वास्थ्य असतानाही आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि उपस्थितांशी त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. यानिमित्ताने 'एज इज जस्ट नंबर्स' हे सिद्ध झाले आणि उपस्थितांचा उत्साह दुणावला.

सेल्फींचा 'क्लिकक्लिकाट'

डॉक्टरांचा कौतुक सोहळा अनिमिष नेत्रांत साठवून घेण्यासाठी डॉक्टरांचे कुटुंबीयही उपस्थित होते. डॉक्टरांचे नाव घोषित झाल्यावर नातेवाईक आणि उपस्थित टाळ्यांचा कडकडाट करत होते. डॉक्टरांचा फोटो आणि सोहळा कॅमेर्‍यात कैद करण्यासाठी त्यांचे नातेवाईक व्यासपीठासमोर उत्साहाने सरसावत होते. कार्यक्रमानंतर सर्वांनी आवर्जून सन्मानचिन्हासह सेल्फीही काढले.

डॉक्टरांनी विविध विषयांवर साधला अनौपचारिक संवाद

स्त्रीरोग, वंध्यत्व, मधुमेह, योगोपचार, दंत उपचार अशा विविध विषयांमध्ये पारंगत असलेल्या डॉक्टरांनी 'पुढारी'च्या प्रतिनिधीशी अनौपचारिक संवाद साधला. यावेळी डॉक्टरांनी सर्वच आजारांना कमी वयात मिळणारे आमंत्रण, बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर होणारा परिणाम, प्रतिबंधात्मक उपाय, वेळेवर निदान आणि उपचार होण्याची गरज या महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन, डॉक्टर-रुग्ण नाते, भारतातील आणि परदेशातील उपचार पद्धती या विषयांनाही स्पर्श केला. चंगळवादाकडे आकर्षित न होता प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य दिले पाहिजे, असा मोलाचा सल्लाही डॉक्टरांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news