

संतोष बामणे
जयसिंगपूर : कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक पोस्टमार्टेम होणारे जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शवविच्छेदन गृहाची दुरवस्था झाली होती. अखेर येथील शवविच्छेदन गृह आता अद्ययावतपणे सेवा देत असल्याने मृतदेहाची हेळसांड थांबली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र राज्यात अव्वल बनले आहे. शिवाय आता शवविच्छेदन गृह ही अद्ययावत बनल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा गेल्या 5 वर्षांत मोठा कायापालट झाला आहे. तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तरातून राज्यात अव्वल स्थानावर पोहोचली आहे. हे प्राथमिक आरोग्य केंद्र जयसिंगपूर, उदगाव, चिपरी, कोंडिग्रे, चिंचवाड, संभाजीपूर आदी गावांचा समावेश आहे. या 6 गावांत 1 लाख 20 हजार लोकसंख्या असून याचा कार्यभार आरोग्य केंद्रावर आहे. त्याचबरोबर रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग येथून जात असून येथील अपघात व 6 गावांतील होणार्या घटनातील संशयित मयतावर जयसिंगपूर आरोग्य केंद्रात पोस्टमार्टेम केली जाते.
येथील शवविच्छेदन गृहाची मोठी दुरवस्था झाली आहे. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या फंडातून शवविच्छेदन गृहाच्या बळकटीकरण व विस्तारीकरण करण्यासाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. यातून येथील शवविच्छेदन गृह अद्ययावतपणे उभारण्यात आले आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या 2 वर्षांत 112 मृतदेहांवर शवविच्छेदन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक शवविच्छेदन करणारे हे प्राथमिक आरोग्य केंद्र अव्वल स्थानी आहे.
अशा आहे सुविधा...
या शवविच्छेदन गृहात प्रशस्त कट्टा उभारण्यात आला आहे. मृतदेहाची स्वच्छता करण्यासाठी स्पिंकलर लावण्यात आली आहे. शवविच्छेदन करताना रक्त कट्ट्याव्यतिरिक्त इतर ठिकाणी पडू नये याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यात अद्यावतपणे लाईटस बसविण्यात आली आहे. शिवाय लागणारे साहित्यही चांगल्या दर्जाचे ठेवण्यात आले आहे. शिवाय या गृहाची स्वच्छता ठेवण्यासाठी स्लॅपपर्यंत फर्शी बसविण्यात आली आहे.