

कोल्हापूर, सतीश सरीकर : थेट पाईपलाईन योजना कोणत्याही परिस्थितीत मे 2023 पर्यंत पूर्ण करणारच… जूनमध्ये योजना पूर्ण होईल… ऑगस्टमध्ये पाणी येईल… अशा वल्गना महापालिकेचे अधिकारी छातीठोकपणे करत होते. योजनेचे बहुतांश काम पूर्ण झाले असले, तरी प्रत्यक्षात आणखी काही दिवस लागणार आहेत. ट्रायल अँड रनसाठी (चाचणी) तीन महिने दिले जाणार आहेत; मगच योजनेतून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत थेट पाईपलाईनच्या पाण्याने अभ्यंगस्नान होणार की नव्या वर्षाची भेट म्हणून योजनेचे पाणी कोल्हापुरात येणार? याची उत्सुकता शहरवासीयांना आहे.
ऑगस्ट 2014 मध्ये योजनेसाठी भूमिपूजनाचा नारळ फुटला. 488 कोटींची योजना राबविण्यात येत आहे. तब्बल 9 वर्षे उलटली तरीही कोल्हापूरकर पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. योजना पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. कोल्हापूर शहरासाठी काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनने पाणी आणण्यात येणार आहे. त्यासाठी धरणातील पाणी इंटेक वेलमध्ये घेतले जाईल.
इंटेकवेलमधून ते पाणी इन्स्पेक्शन वेल क्र. 1 मध्ये आणि पुढे इन्स्पेक्शन वेल क्र. 2 मध्ये पाणी जाईल. येथून 140 मीटर लांबीच्या कनेक्टिंग पाईपद्वारे ते पाणी जॅकवेल क्र. 1 व जॅकवेल क्र. 2 मध्ये पडेल. तब्बल 150 फूट खोलीची ही जुळी जॅकवेल आहेत. या जॅकवेलमधील पाणी पंप हाऊसद्वारे उचलून ते 15 लाख क्षमतेच्या ब—ेक प्रेशर टँकमध्ये जाईल. तेथून ग्रॅव्हिटीने पाणी 53 किलोमीटर लांब पाईपलाईनमधून कोल्हापूर शहरापर्यंत येईल. पुईखडी येथे 80 एम. एल. डी. क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करून ते कोल्हापूर शहरात वितरीत केले जाणार आहे.
2045 च्या लोकसंख्येनुसार आराखडा
कोल्हापूर शहराची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 5 लाख 49 हजार आहे. सद्यस्थितीत शहराची लोकसंख्या 6 लाखांवर गेली आहे. 2045 सालात हीच लोकसंख्या 10 लाख 29 हजार होईल, असे गृहीत धरण्यात आले आहे. त्यानुसार दैनंदिन 238 द. श. लि. पाण्याची आवश्यकता लागेल. त्यानुसारच योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. काळम्मावाडी धरणातील एकूण पाणीसाठ्यापैकी 2.3 टी. एम.सी. (76.85 दशलक्ष घनमीटर) पाणीसाठा कोल्हापूर शहरासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
थेट पाईपलाईनचे पाणी अमृत योजनेवर अवलंबून
कोल्हापूर शहरातील अंतर्गत मुख्य वितरण नलिका बदलणे आणि उपनगरात नव्या वितरण नलिका टाकण्यासाठी अमृत योजनेंतर्गत 114 कोटी 81 लाखांचा निधी मिळाला आहे. त्याअंतर्गत शहरात तब्बल 400 किलोमीटर लांबीच्या पाईपलाईनचे जाळे विणले जाणार आहे. तसेच 12 ठिकाणी पाणी साठविण्यासाठी उंच टाक्या आणि तीन ठिकाणी पंप हाऊस बांधण्यात येणार आहेत. 1 सप्टेंबर 2018 ला संबंधित कामासाठी ठेकेदाराला वर्कऑर्डर दिली आहे. 31 ऑगस्ट 2020 पर्यंत काम पूर्ण करायचे होते. परंतु, 2023 संपत आले तरीही, अद्याप 50 टक्केही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे थेट पाईपलाईनचे पाणी कोल्हापुरात आले, तरीही ते नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवणार कसे? असा प्रश्न आहे.