पक्षाने आदेश दिल्यास शौमिका महाडिक ‘हातकणंगले’च्या निवडणूक रिंगणात : धनंजय महाडिक

धनंजय महाडिक
धनंजय महाडिक

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पक्षाने आदेश दिला, तर शौमिका महाडिक लोकसभेच्या हातकणंगले मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात असतील, असा सूचक इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी दिला. महायुतीच्या उमेदवारांची गुरुवारी घोषणा होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्यांच्या जीवावर गेल्या निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला, ते सर्व आता भाजपमध्ये आहेत. यामुळे राज्यात काँग्रेसची एकही जागा निवडून येणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

भाजपच्या जिल्हा कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना खा. महाडिक म्हणाले, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान कोल्हापूर दौर्‍यावर आले होते. यावेळी पदाधिकार्‍यांनी दोनपैकी एक मतदारसंघ आपल्याकडे घ्यावा, असा दावा केला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप घराघरांत पोहोचण्यासाठी लोकसभेची एक जागा भाजपकडून लढवण्याची पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भूमिका होती. मात्र, भाजप पक्षश्रेष्ठींकडून अद्याप कोणतीही माहिती आम्हापर्यंत पोहोचलेली नाही. मात्र, जर पक्षाने आदेश दिला, तर शौमिका महाडिक हातकणंगलेच्या निवडणूक रिंगणात असतील, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. उमेदवारी जाहीर होण्यास वेळ होत असला, तरी योग्य आणि पंतप्रधान मोदींच्या कामावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे सांगत खा. महाडिक म्हणाले, हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिल्याचे खासदार संजय मंडलिक माध्यमांना सांगत आहेत. तिन्ही पक्षांचे एकमत झाल्यानंतरच उमेदवारीची घोषणा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तीन पक्ष असल्यामुळे उमेदवारी जाहीर होण्यास वेळ झाला, हे आम्हाला मान्य आहे. गुरुवारी (दि. 28) राज्यातील सर्वच उमेदवार जाहीर होतील, अशी शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

महायुतीचे उमेदवार घोषित झाल्यानंतर सर्वपक्षीयांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यातच आमची प्रचाराची रणनीती ठरवली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम महाराष्ट्रात किमान दोन सभा घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातार्‍यातील उमेदवारीवर बोलताना, उमेदवारीबाबत वरिष्ठांचा निर्णय असणार आहे. आज त्यांनी रॅली काढली, कदाचित त्यांना उमेदवारीचे संकेत मिळाले असतील, असेही त्यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीची राज्यातील ताकद नाकारता येणार नाही. मात्र, सन्मानपूर्वक जागा न मिळाल्याने ते एकटे लढणार आहेत. तरीही वरिष्ठ पातळीवर काँग्रेसला काही जागांवर पाठिंबा दिला आहे. त्याचप्रमाणे भाजपलादेखील काही जागांवर त्यांनी पाठिंबा द्यावा, असे सांगत 'वंचित'चा महायुती व महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news