अलमट्टीमुळे कोल्हापुरात पूर येऊ नये याची खबरदारी घ्या : अजित पवार

अलमट्टीमुळे कोल्हापुरात पूर येऊ नये याची खबरदारी घ्या : अजित पवार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : अलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे कोल्हापूर शहर, सांगलीत पुराची समस्या येऊ नये, यासाठी आतापासून नियोजन करण्याच्या तसेच मेडिगट्टा, गोसीखुर्द धरणाबाबतही सतर्क राहून गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तसेच पुणे शहरात पाणी साचू नये म्हणून पुणे महापालिकेने योग्य नियोजन करावे, असेही त्यांनी पुणे मनपाला सांगितले आहेत.

पवार यांनी त्यांच्या मंत्रालयीन दालनात सोमवारी राज्यातील पाऊसमान, खते, बी-बियाणे पुरवठा, पीक कर्ज वितरण, टँकरची स्थिती, धरणांतील पाणीसाठा व विसर्गाचे नियोजन, पूर नियंत्रण, चारा उपलब्धता याबाबत दूरद़ृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेतला.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार असल्यामुळे धरणांमधील पाणी सोडण्याचे काटेकोर नियोजन करावे. आंतरराज्यीय धरणांवर जलसंपदा विभागाने आपला समन्वय अधिकारी नियुक्त करावा, त्याच्या माध्यमातून योग्य वेळी पाण्याच्या विसर्गाबाबत नियोजन करावे. पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन शहरे, गावांत पाणी येणार नाही याची काळजी घ्यावी.

पुण्यासाठी विशेष सूचना

पहिल्याच पावसात पुणे शहरातील विविध भागात पाणी साचल्याचे दिसून आले. महापालिकेने याबाबत त्वरित आवश्यक उपाययोजना कराव्यात. मोठ्या पावसात पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे.

या बैठकीला महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, आपत्ती व्यवस्थापनचे संचालक लहूराज माळी, कृषी विभागाचे उपसचिव चांदवले आदी उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, अमरावती विभागीय आयुक्त निधी पांडे, नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदरी, छत्रपती संभाजीनगर विभागाचे उपायुक्त जगदीश मणियार, नाशिक विभागाच्या उपायुक्त राणी ताटे, कोकण विभागाचे उपायुक्त संजीव पलांडे, कृषी आयुक्त रावसाहेब भागडे यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आपल्या विभागाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news