

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पुराला अलमट्टी आणि हिप्परगी धरणातील पाणी कारणीभूत ठरते, हे स्पष्ट आहे. यामुळे यावर्षी या दोन्ही धरणांतून पाण्याचा योग्य आणि वेळेवर विसर्ग होईल, याकरिता स्वतंत्र अधिकारी नेमा, त्यांच्या विसर्गांवर स्ट्राँग मॉनिटरिंग करा, या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्या, कर्नाटकशी समन्वय साधा, असे आदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाला दिले.
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासमवेत लवकरच बैठक घेऊ, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आबिटकर यांनी आढावा बैठक घेतली. आबिटकर म्हणाले, अलमट्टी आणि हिप्परगीतील विसर्ग हा मुद्दा महत्त्वाचा आहे, तो टॉप प्रॉयोरिटी म्हणूनच बघा. या दोन्ही धरणांतून पाण्याचा योग्य प्रमाणात विसर्ग झाला पाहिजे. याकरिता स्वतंत्र यंत्रणा तैनात करा. त्याचे नियोजन करा.