

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : शहरातील बाजार शुल्क वसुलीत गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव केला असून ही यंत्रणा व्यापार्यांना त्राससदायक ठरणारी आहे. त्यामुळे खासगी ठेका तातडीने रद्द करावा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांना दिले आहे.
इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे शहरातील बाजार शुल्क वसुलीचे काम ठेकेदाराकडून सुरु आहे. परंतु हा ठेका घेणार्या मक्तेदाराच्या मागे काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत. त्यामुळे बाजारात रस्त्यावर उभारून व्यापार करणार्या गरीब व्यापार्यांचे पैसे जमा करण्यासाठी नेमलेले काही कर्मचारी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे आहेत. ते व्यापार्यांवर जबरदस्ती, धकटपटशा आणि दमदाटी करण्याचा धोका आहे. यातून व्यापार्यांना या ठेकेदाराच्या गुंड प्रवृत्तीच्या कामगारांकडून मोठा त्रास होणार आहे. तसेच नियमापेक्षा जादा वसुली करून लुटण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे बाजार ठेका रद्द करावा, असे निवेदनात म्हटले आहे.
दोन वर्षांनंतर यंदा निर्बंध खुले झाल्याने दिवाळीसाठी व्यापार्यांनी जय्यत तयारी केली. मात्र, अनपेक्षितपणे खासगी वसुली सुरु झाली आहे. यास व्यापारी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला असतानाही महापालिकेने खासगीकरणातून वसुली सुरु केली आहे. यापूर्वीही हा प्रयोग अयशस्वी झाला असताना महापालिकेचा हट्टाहास का? असा सवाल व्यापार्यांतून व्यक्त होत आहे.
हेही वाचलंत का ?