Shivaji Market Slab Removal | शिवाजी मार्केटच्या स्लॅबचा धोकादायक भाग उतरविला

ढपले पडल्याने नागरिकांमध्ये संताप; टर्न टेबल लॅडरच्या साहाय्याने मनपाची तातडीची कार्यवाही
कोल्हापूर : महापालिकेच्या टर्न टेबल लॅडर वाहनाच्या उंच शिडीवरून शिवाजी मार्केटच्या इमारतीचा धोकादायक भाग उतरवून घेताना मनपा यंत्रणा.
कोल्हापूर : महापालिकेच्या टर्न टेबल लॅडर वाहनाच्या उंच शिडीवरून शिवाजी मार्केटच्या इमारतीचा धोकादायक भाग उतरवून घेताना मनपा यंत्रणा.(छाया : नाज ट्रेनर)
Published on
Updated on

कोल्हापूर : येथील शिवाजी मार्केटच्या जुन्या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग गुरुवारी अचानक कोसळल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. स्लॅबचे ढपले पडल्याने व्यापारी आणि नागरिकांतून संताप व्यक्त होत असतानाच महापालिका प्रशासनाने शुक्रवारी तातडीने धोकादायक भाग उतरवून घेतला. महापालिकचा अग्‍निशमन विभाग आणि पवडी विभागाच्या संयुक्त पथकाने टर्न टेबल लॅडर या वाहनाच्या उंच शिडीचा वापर करून स्लॅबचा धोकादायक भाग काढून टाकला.

शिवाजी मार्केटची इमारत जुनी झाल्याने तिच्या स्लॅब तसेच अन्य भागांची दुरवस्था झाली आहे. गुरुवारी स्लॅबचा काही भाग अचानक खाली पडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बाजारपेठेत नागरिकांची मोठी वर्दळ असताना इमारतीचा भाग कोसळल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती.

या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने तातडीने धोकादायक भागाची पाहणी करून तो उतरविण्याचा निर्णय घेतला. मात्र, इमारतीची उंची आणि स्लॅबचा भाग सुरक्षितपणे काढण्यासाठी विशेष यंत्रणेची आवश्यकता होती. त्यानुसार अग्‍निशमन विभागाचे टर्न टेबल लॅडर वाहन घटनास्थळी आणण्यात आले. या वाहनाच्या उंच शिडीच्या साहाय्याने कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या वरच्या भागात पोहोचून धोकादायक स्लॅबचा भाग काळजीपूर्वक उतरवून घेतला. महापालिकेच्या अग्‍निशमन विभागासह पवडी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कारवाईमुळे संभाव्य दुर्घटना टळण्यास मदत झाली. मात्र, शिवाजी मार्केटच्या जुन्या इमारतीच्या सुरक्षिततेबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी व्यापारी आणि नागरिकांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news