

मुंबई : एका महिलेने पैशांसाठी आपल्या अल्पवयीन मुलीला शेजारच्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडल्याची संतापजनक घटना मुंबईच्या घाटकोपर परिसरात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मुंबईतील घाटकोपर परिसरात ही घटना घडली आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी तेथील एका नामांकित शाळेत दहावीत शिकते. तिच्या आईला पैशांची चणचण भासत होती. त्यामुळे ती नेहमी आपल्या मुलीला शेजारच्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी पाठवत होती. मुलीने अनेकदा नकार दिला. पण आईने तिच्यावर बळजबरी केली. पीडित मुलीवर दररोज अत्याचार होत होते. दरम्यान, ती एकदा वर्गात आली असता, तिला आपल्यावरील अत्याचार आठवून भर वर्गात रडू कोसळले. हे पाहून तिच्या वर्गशिक्षिकेने तिला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली. तेव्हा तिने आपल्यासोबत घडणारा प्रसंग त्यांना सांगितला आणि या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. त्यानंतर पोलिसांनी पीडितेची आई व शेजारच्या व्यक्तीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.