

आशिष आडिवरेकर
कोल्हापूर : अडीच वर्षांत सायबर भामट्यांनी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची तब्बल १२२ कोटींची रक्कम लुटली असून यापैकी केवळ २२ कोटी रुपयांची रक्कम ‘फ्रिज’ करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. सायबर फसवणुकीची भीती, फसवणुकीनंतर काय करायचे, सायबर पोलिसांकडील अपुरे मनुष्यबळ, स्थानिक पोलिस ठाणे आणि सायबर पोलिस यांच्यातील विसंवादाचेच टाईमिंग सायबर भामटे साधत आहेत.
जिल्ह्यात गेल्या ३० महिन्यांत सायबर फसवणुकीच्या तब्बल १० हजार ६०० तक्रारी दाखल झाल्या असून सायबर गुन्हेगारांनी तक्रारदारांच्या १२२ कोटी रुपयांवर डल्ला मारला. दररोज सरासरी १२ ते १३ तक्रारी दाखल होत आहेत.
पोलिस ठाण्यात चालढकल
प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये सायबर तक्रार दाखल करून घेण्यासाठी एका स्वतंत्र महिला अंमलदारांची नेमणूक आहे. याचे विशेष प्रशिक्षणही दिले आहे. मात्र, या महिला कर्मचाऱ्यांकडून फिर्याद दाखल करून पुढील प्रक्रिया करण्यास चालढकल केल्याचा अनुभव अनेक तक्रारदारांना येत आहे. करवीर पोलिस ठाण्यात ११ लाखांची ऑनलाईन फसवणुकीची तक्रार दाखल करून घेण्यास तब्बल दोन महिने कालावधी लागल्याचा अनुभव एका तक्रारदाराने सांगितला आहे.
फसवणूक झाल्यास ‘गोल्डन अवर’मध्ये तक्रार केल्यास फसवणुकीची रक्कम परत मिळण्यास मदत होते. मात्र, तक्रारदार काहीसा गोंधळलेला असतो, त्यामुळे तो पोलिसांकडे तत्काळ येण्यास किंवा ऑनलाईन पोर्टलवर तक्रार करण्यास मागे-पुढे पाहतो. याचाच फायदा सायबर भामट्यांना होत आहे.
संजय हारुगडे, पोलिस निरीक्षक, कोल्हापूर सायबर विभाग
कोल्हापुरातील सायबर फसवणुकीचा आकडा
वर्ष तक्रारी फसवणूक रक्कम गोठवलेली रक्कम
२०२४ ४,१०३ ५५ कोटी ८१ लाख ५ कोटी ९२ लाख
२०२५ ४,४६५ ४४ कोटी ३५ लाख ६ कोटी ५३ लाख
२०२६ (मे) १,७७३ १९ कोटी ९८ लाख ९ कोटी १५ लाख