

7-foot-long crocodile caught in fish net in Chinchwad
शिरोळ : चिंचवाड (ता.शिरोळ) येथील कृष्णा नदीत माशाच्या जाळीत सुमारे 7 फूट लांबीची मगर अडकली होती. स्थानिक प्राणीमित्रांनी धाव घेवून या मगरीला जीवदान दिले. त्यानंतर या मगरीला कोल्हापूर जिल्हा वन्यजीव बचाव पथकाच्या स्वाधीन केले. दरम्यान, कृष्णा नदी पात्रात मगरींचा वावर वाढल्याने नदीकाठावरील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.
चिंचवाड येथील कृष्णा नदीत मासे पकडण्यासाठी सोडण्यात आलेल्या जाळीमध्ये मगर अडकल्याचे नागरिकांना सोमवारी सकाळी आढळून आले. स्थानिक प्राणी मित्र विजय ठोमके, हनमंत न्हावी-हडपद, सुशांत ठोमके, युवराज नंदीवाले, शशिकांत ठोमके, सुनील ठोमके, महेंद्र सातपुते, सुहास मोहिते व अक्षय मगदूम यांनी जाळीत अडकलेल्या मगरीला सुखरूपपणे बाहेर काढून कोल्हापूर जिल्हा वन्यजीव बचाव पथकाच्या स्वाधीन केले. या ठिकाणी वनपाल संजय कांबळे, शिरोळ तालुक्याचे वनरक्षक अरुण खामकर, वनरक्षक हातकणंगले मंगेश वंजारे, वन्यजीव बचाव पथक कोल्हापूर व चिंचवाड ग्रामस्थ उपस्थित होते.
मगरींचा वावर वाढला
शिरोळ तालुक्यात वारंवार नदी काठावर मगरींचे दर्शन होत आहे. उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड तसेच अकिवाट या भागात मगरी दिसून आले आहेत. नदीकाठावर शेतकरी व मासेमारी करणारे नागरिक फिरत असतात. त्यामुळे नदी काठावर भीतीचे वातावरण पसरले आहे.