

इचलकरंजी : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या इचलकरंजी विभागीय केंद्रातील तब्बल 13 कोटी 41 लाख 71 हजार 866 रुपयांची फसवणूक व घोटाळाप्रकरणी गावभाग पोलिसांनी बुधवारी आणखी दोघा संशयितांना अटक केली. तय्यब रजाक मोटलानी आणि तबसुम तय्यब मोटलानी (दोघे रा. ताकारी, ता. वाळवा) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या आता 13 झाली आहे.
शहरातील वडगाव बाजार समिती परिसरात राज्याचे वखार महामंडळाचे विभागीय केंद्र आहे. याठिकाणी वार्षिक तपासणीमध्ये घोटाळा व फसवणूक झाल्याचे प्रकरण उजेडात आले. सुमारे 10 कोटी 42 लाख 18 रुपयांचा धान्यसाठा गोदामात आढळून आला नाही. तसेच 1 कोटी 35 लाख रुपयांची तूटही तपासणीत निदर्शनास आली. सांगली अर्बन को-ऑप. बँकेच्या इस्लामपूर शाखेकडून कमी वजनाच्या आणि साठा नसलेल्या वखार पावत्यांवर दीड कोटींहून अधिकचे कर्ज घेऊन त्याचा बोजा महामंडळाच्या प्रणालीमध्ये दाखवल्याचेही उजेडात आले होते. या प्रकरणातील मुख्य संशयित सहायक शाखा अधीक्षक तथा केंद्रप्रमुख महंमद शहाबुद्दीन पेंढारी याने वखार महामंडळाची व्यापारी तथा ठेवीदारांच्या संगनमताने 13 कोटी 41 लाख 71 हजार 866 रुपयांची फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी वखार महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक तृप्ती कोळकर यांनी गावभाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी 19 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
संशयितांपैकी अटक करण्यात आलेले चंद्रकांत नानासो मगर, पोपट मुरलीधर पाटील, श्रेयस संजय माने, कुमार दशरथ जाधव, आनंदा बाबुराव जाधव, प्रल्हाद बाबूराव जाधव, जयंत नरहर व्यास, ज्ञानेश्वर नारायण पेठकर, यश सुधीर जाधव, सुशांत माणिकराव कोळेकर, कृष्णात पोपट फारणे हे 11 जण सध्या पोलिस कोठडीत आहेत तर तय्यब रजाक मोटलानी आणि तबसुम तय्यब मोटलानी या संशयित दाम्पत्यास कोल्हापुरातून बुधवारी अटक करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातील रज्जाक नूरमहम्मद मोटलानी, इरफान तय्यब मोटलानी, मयुर विठ्ठल भोसले (रा. विटा), साहेबराव बबन आडके (रा. तुपारी, ता. पलूस), तानाजी आनंदा मराळे (रा. दह्यारी, ता. पलूस) अद्याप पसार आहे. त्यांचा विविध पथकांद्वारे शोध घेण्यात येत आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत वाघमारे करीत आहेत.