

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा: खिद्रापूर (ता.शिरोळ) ग्रामपंचायतीकडे ग्रामस्थांच्या आलेल्या तक्रारी अर्जावरून ग्रामसेवकाच्या सहीने पत्रव्यवहार व नोटीसा लागू करून योग्य ती कार्यवाही करावी; असा आदेश पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शंकर कवितके यांनी ग्रामसेवक आप्पासाहेब मुल्ला यांना दिला आहे.
खिद्रापूर ग्रामपंचायतीकडे अतिक्रमित बांधकाम मोबाईल टॉवरची उभारणी आणि वीज वितरण कंपनीशी वीज चोरीप्रकरणी नोटीस व पत्रव्यवहारावर सरपंच सारिका कदम सह्या करत नाहीत. आम्हाला निवडून दिलेल्या ग्रामस्थांच्या तक्रारीचे निरसन होत नसेल, तर सभागृहाचा काय फायदा. त्यामुळे ग्रामपंचायत बरखास्त करावी अशी मागणी उपसरपंच पूजा पाटील-खानोरे, अमित कदम यांनी गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्याकडे केली आहे.
दरम्यान गटविकास अधिकारी कवितके यांनी ग्रामसेवक मुल्ला यांना सहीचे अधिकार दिल्याने वीज चोरी प्रकरण आणि या प्रकरणातील संशयीतांना मात्र चांगलेच भोवणार असल्याने खिद्रापूर गावात खळबळ उडाली आहे. खिद्रापूर येथे पेयजल केंद्र सुरू करणे, ग्रामपंचायतीने मोफत जागा देऊन पाण्याचा पुरवठा करणे आणि दहा वर्षापर्यंत दोन रुपयात वीस लिटर पाणी ग्रामस्थांना मक्तेदाराने देण्याचा करार झाला आहे. ४ दिवसांपूर्वी मक्तेदाराने दोन रुपयांऐवजी चार रुपये दर केले आहेत. दरवाढीला ग्रामस्थांचा विरोध आहे. गावामध्ये अतिक्रमित बांधकामाबाबत आणि मोबाईल टॉवर उभारणीला विरोध करत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार केली आहे. तर ग्रामपंचायतीच्या इमारतीत बेकायदेशीर बांधकाम करून त्या ठिकाणी वीज चोरी केल्याचा प्रकार घडला आहे.
ग्रामस्थांच्या आलेल्या तक्रारीवरून संबंधित अतिक्रमणधारक, वीज वितरण कंपनी आणि मोबाईल टॉवर उभारणी करणाऱ्यांना नोटीसा द्याव्या. तसेच पत्रव्यवहार करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी उपसरपंच पाटील खानोरे, सदस्य अमित कदम,इर्शाद मुजावर, जयश्री लडगे,सरताज ढालाईत यांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे. ग्रामसेवक मुल्ला यांनी याबाबतची पत्रे आणि नोटीस सरपंच कदम यांच्यासमोर सहीसाठी सादर केली असता त्यांनी आजतगायत त्यावर सह्या केल्या नाहीत.
यासर्व बाबीला सरपंच कदम यांचे पाठबळ आहे का?असा सवाल उपस्थित करत. ग्रामस्थांनी आम्हाला निवडून दिले आहे. ग्रामस्थांच्या मागण्यांचा विचारच होत नसेल तर सभागृह काय कामाचे असे सांगत सभागृह बरखास्त करा अशी मागणी केली आहे.