कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मराठ्यांना कुणबी म्हणून दाखले पाहिजे असतील, तर 10 वर्षे लंगोटा लावून राहिले पाहिजे, मराठा हातात वस्तारा घेऊन काम करायला तयार आहेत का? अशी बेताल वक्तव्ये करणारे माजी मंत्री प्रकाश शेंडगे यांचा सकल मराठा समाजाच्या वतीने अनोख्या पद्धतीने लंगोट आंदोलनातून तीव्र निषेध नोंदविण्यात आला. ऐतिहासिक दसरा चौकातील राजर्षी शाहूंच्या पुतळ्यासमोर झालेल्या कुस्तीत कोल्हापूरच्या लंगोटा घातलेल्या पैलवानाने शेंडगे यांचा मुखवटा लावलेल्या पैलवानाला चितपट करून अस्मान दाखविले. इतकेच नव्हे, तर त्याच्या छाताडावर बसून 'आता कसं वाटतंय? हिंमत असेल तर ये दसरा चौकात, हातात वस्तारा घेऊन बसलोय…' असे प्रतिआव्हानही दिले.
समाजात तेढ निर्माण करणारे वादग्रस्त वक्तव्य करणार्या शेंगडे यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईच्या मागणीची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांकडे देण्यात आली. यानंतर कार्यकर्त्यांनी प्रकाश शेंडगेंसह मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. 'या भुजबळ, शेंडगेचे करायचे काय, खाली डोकं- वर पाय' यासह विविध घोषणा देण्यात आल्या. वस्ताद तानाजी कुर्हाडे व महेश नलवडे यांनी लावलेल्या या अनोख्या कुस्ती-लंगोटा आंदोलनात सुबोध साठे व वेदांत वारकर यांनी सहभाग घेतला.
प्रकाश शेंडगे बेजबाबदार वक्तव्ये करून मराठा-धनगर समाजातील एकोपा-बंधुभाव याला छेद देत आहेत. यामुळे दोन्ही समाजांत नाहक तेढ निर्माण केले जात आहे. अशा लोकांवर शासनाने तातडीने कारवाईची मागणीही आंदोलकांनी केले.
आंदोलनात वसंतराव मुळीक, अॅड. बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, विजय देवणे, दिलीप देसाई, राजू तोरस्कर, उदय लाड, अॅड. सतीश नलवडे, अॅड. सुरेश कुर्हाडे, चंद्रकांत पाटील, अवधूत पाटील, उत्तम वरुटे, महादेव जाधव, महादेव पाटील, अमर निंबाळकर, प्रकाश पाटील, गोपाळ पाटील, संपत्ती पाटील, संयोगीता देसाई, शैलजा देसाई, सुनीता पाटील, सुधा सरनाईक आदींसह कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
विविध संस्था-संघटना, व्यक्तींचा पाठिंबा
दरम्यान, आंंदोलनाला महाराष्ट्र हायस्कूलचे माजी विद्यार्थी इयत्ता दहावी (सन 1984 बॅच) यांनी पाठिंबा दिला. यात डॉ. विजय पाटील, विक्रम राऊत, सुनील घाग, श्रीधर मांगलेकर, महेश पाटील व सहकार्यांचा समावेश होता. तसेच भाजपच्या शहर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाराणी निकम, संगीता खाडे, पार्टे व सहकारी महिलांनीही पाठिंबा दिला. कोल्हापूर तीन आसनी रिक्षा संघटनेचे चंद्रकांत भोसले, राजेंद्र जाधव, सुभाष शेटे, अविनाश दिंडे, राजू पवार, नरेंद्र पाटील, जाफर मुजावर, चंद्रकांत ओतारी यांच्यासह सहकार्यांनी पाठिंबा दिला.