

कळे, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर कळे-मरळी दरम्यानच्या पुलाच्या कुंभी नदीच्या पुराचे पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे कळे कॅन्टीनवरील अनेक दुकानांत पुराचे पाणी नुकसान झाले आहे. कळे-म्हासुर्ली रस्त्यावरील वाघुर्डे येथे शुक्रवारी (दि.26) पहाटे धामणी नदीचे पाणी आल्याने धामणी खोऱ्यातील अनेक गावांचा थेट संपर्क तुटला आहे.
कळे-मरळी दरम्यानच्या नवीन पुलाच्या अपूर्ण असलेल्या भरावाच्या ठिकाणी पुराचे पाणी आल्याने या मार्गावरुन होणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली. गुरुवारी (दि.25) या ठिकाणी मुरुम टाकून तात्पुरती वाट सुरु करण्यात आली. पुराचे पाणी रस्त्याला लागून असल्याने पावसाचा जोर वाढल्यास हा रस्ता पुन्हा पाण्याखाली जावून वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. कळे पुलापासून कॅन्टीन, पेट्रोल पंप परिसरातील रस्त्यापासून खाली असणाऱ्या दुकानामध्ये पुराचे पाणी आल्याने नुकसान झाले. दस्तुरी चौकापासून गावात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर काही अंतरावर पुराचे पाणी आल्याने येथून होणारी वाहतूक बंद झाली आहे.
कळे-म्हासुर्ली या प्रमुख जिल्हा मार्गावरील वाघुर्डे (ता.पन्हाळा) येथे सुमारे अर्धा किलोमीटर पर्यंत धामणी नदीच्या पुराचे पाणी आल्याने येथून पुढे धामणी खोऱ्यातील गावांचा थेट संपर्क तुटला. तसेच पुराचे पाणी वाघुर्डे येथील प्राथमिक शाळेच्या आवारात घुसले. याठिकाणी ओढ्याच्या पलीकडे जनावरांचे गोठे असणाऱ्या नागरिकांनी सुमारे तीन ते चार फूट पाण्यातून ये-जा करावी लागली. या परिसरात जागोजागी विद्युत खांब कोसळून विद्युतवाहिन्या तुटल्याने कळे बाजारपेठेसह अनेक गावातील विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. गोठे (ता.पन्हाळा) येथे चार दिवसांपासून वीजपुरवठा खंडीत झाल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. तांदूळवाडी गावाला पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने याठिकाणी बेटाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे कळे परिसरासह पश्र्चिम पन्हाळा व धामणी खोऱ्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे.