कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पुरोगामी विचारांचा आणि सर्वांगीण लोकोपयोगी कार्याचा वारसा विविध माध्यमांतून जेन-झी पिढीत रुजविण्याचा निर्धार राजर्षी शाहू कार्य संवर्धन संमेलनात करण्यात आला.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या ५० टक्के आरक्षणाच्या क्रांतिकारी निर्णयाच्या १२५ व्या वर्षानिमित्त राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे या संमेलनाचे आयोजन रविवारी शिवाजी पेठेतील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसमध्ये करण्यात आले होते. प्रमुख पाहूणे संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील होते. अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. भाऊसाहेब खणे यांनी शाहूकालीन कागदपत्रांचा अभ्यास, लिप्यांतर करून विविध माध्यमांतून त्यांचा प्रचार-प्रसार काळाची गरज असल्याचे सांगितले. डॉ. रमेश जाधव यांनी, राजर्षी शाहूंची बदनामी करणारे मुद्दे खोडून काढण्यासाठी लेखनाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
संमेलनात प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील, प्राचार्य जे. के. पवार, लेखक श्रीराम पचिंद्रे, प्रा. डॉ. गिरीश मोरे, डॉ. संभाजीराव बिरांजे, चंद्रकांत पाटील, प्रा. डॉ. कपिल राजहंस, चंद्रकांत पाटील, डॉ. नंदकुमार मोरे, पुराभिलेखाधिकारी गणेशकुमार खोडके, कॉम्रेड उमेश सूर्यवंशी, स्वप्नजा घाटगे, डॉ. देविकाराणी पाटील, प्रा. छाया पोवार, राम यादव, दिग्दर्शक सुनील माने, विक्रम रेपे, मोडीतज्ज्ञ अमित आडसुळे, शाहीर विजय शिंदे, डॉ. प्रल्हाद माने यांनी शाहू विचारांच्या प्रचारासाठी विविध उपाय-योजनांसह मोलाचे मार्गदर्शन केले. निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन बबनराव रानगे यांनी केले. आभार संजय कांबळे यांनी मानले.
शाहूंच्या पाऊलखुणा नष्ट करण्याचे प्रयत्न
राजर्षी शाहूंच्या लोकोपयोगी कार्याची साक्ष देणाऱ्या वास्तू भुईसपाट करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. ते रोखण्यासाठी शाहूप्रेमींनी एकजुटीने प्रयत्न करणे अत्यावश्यक असल्याचे डॉ. विलास पवार यांनी सांगितले. सुहास निंबाळकर यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे राधानगरी धरणाची अवस्था बिकट असल्याचा आरोप केला.
‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव अध्यासनाचे पाठबळ
इंद्रजित सावंत यांनी लोकाश्रयाच्या पाठबळावर शाहू कार्य जगभर पोहोचविण्यासाठी शाहू अभ्यासकांच्या मुलाखती, माहितीपटाची निर्मिती व्हावी, यासाठी शिवाजी विद्यापीठातील ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव अध्यासनाचे मोलाचे पाठबळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. डॉ. शिवाजी जाधव यांनी रिल्स- मिम्सच्या माध्यमातून सोशल मीडिया शाहूमय करण्याची सूचना केली.
संमेलनातील ठराव
* राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये शाहू विचारांचे कार्यक्रम झाले पाहिजेत. व्यापारीकरण व भाडेवाढ खपवून घेतली जाणार नाही
* केशवराव भोसले नाट्यगृहाचे खासगीकरण हाणून पाडू
* दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील राजर्षी शाहू महाराजांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी साम्य नसलेला पुतळा बदलावा, अन्यथा कोल्हापूरकर लोकवर्गणीतून तो सन्मानाने बसवतील
* मुंबई येथे राजर्षी शाहू महाराज यांचे यथोचित स्मारक शासनाने उभे करावे