

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सांस्कृतिक, क्रीडा, पर्यटन, पर्यावरण आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना शेकडो कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पांमुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, नागरिकांसह भाविक, पर्यटक आणि खेळाडूंनाही त्याचा मोठा लाभ होणार आहे. शहरातील सात प्रकल्पांचे लोकार्पण, उद्घाटन आणि एका प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (दि. ९) होणार आहे.
महालक्ष्मी मंदिर परिसरातील वाहतूक आणि पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी ३८.८० कोटी रुपये खर्चाची बहुमजली पार्किंग इमारत उभारली आहे. तसेच, गोकुळ हॉटेल परिसरात ४.५० कोटी रुपये खर्चून मेकॅनिकल पार्किंग उभारले आहे. नर्सरी बाग येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधिस्थळाच्या विकासासाठी ९.४० कोटींतून विकासकामे केली आहेत. रंकाळा तलावात ५ कोटी रुपये खर्चून आकर्षक संगीत कारंजे उभारले असून, त्यामुळे रंकाळा परिसराच्या पर्यटन आकर्षणात भर पडणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (एमआरडीपी) अंतर्गत ४८४ कोटी रुपयांचे विविध विकास प्रकल्पही राबविण्यात येणार आहेत. या माध्यमातून शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याबरोबरच नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पुनर्बांधणी
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पुनर्बांधणी २५.१० कोटी रुपये खर्चातून केली जात असून, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे नवे नाट्यगृह उभारले आहे. क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये ६.६६ कोटी रुपये खर्चून ॲस्ट्रोटर्फयुक्त मैदान आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शहरातील पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने दुधाळी येथे १२ कोटी रुपये खर्चून सहा दशलक्ष लिटर क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे.