

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे नूतन भव्य संकुलात येत्या अडीच ते तीन वर्षांत स्थलांतर होईल, अशी अपेक्षा आहे. सध्या भाऊसिंगजी रोडवरील न्यायालय इमारतीत सर्किट बेंचचे कामकाज 18 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. शेंडा पार्क येथे नियोजित न्याय संकुल उभारण्यात येणार असून त्याद़ृष्टीने प्रशासकीय पातळीवर वेगवान हालचाली सुरू आहेत.
नियोजित न्याय संकुलासाठी शेंडा पार्कात 25 एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. नकाशावर तसे मार्किंग करण्यात आले आहे. नियोजित न्याय संकुलात सर्किट बेंचची मुख्य इमारत, न्यायमूर्ती व इतर स्टाफ आदींची निवासस्थाने, अनुषंगिक इमारती, पार्किंग आदीची व्यवस्था करण्यात येणार आहे. या संकुलाचा आराखडा (प्लॅन) करण्यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. उच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार संकुलाचा आराखडा तयार करण्यात येईल.
सार्वजनिक बांधकाम विभागाने कसबा बावडा येथे जिल्हा न्यायालयाची भव्य इमारत उभी केली आहे. 2009-10 ते 2014 या काळात हे बांधकाम पूर्ण झाले.
आठ एकर एवढ्या क्षेत्रावर जिल्हा न्यायालयाचे संकुल उभारण्यात आले आहे. हे एकूण बांधकाम 25 हजार 300 चौरस मीटर एवढे आहे. या बांधकामावर 55 कोटी रुपयांपेक्षा थोडा अधिक खर्च झाला आहे.
जिल्हा न्यायालय संकुलाच्या तुलनेत सर्किट बेंच न्याय संकुलाचे बांधकाम अनेक पटीने भव्य असेल व ते पूर्ण होण्यासाठी अडीच ते तीन वर्षे लागतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली. म्हणजेच सर्किट बेंचचे या नव्या संकुलात सन 2028 मध्ये स्थलांतर होऊ शकेल. त्याद़ृष्टीने प्रशासकीय पातळीवर गतिमानतेने हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, भाऊसिंगजी रोडवरील न्यायालय इमारतीच्या नूतनीकरणाला वेग आला असून, हे काम 10 ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
भाऊसिंगजी रोडवर चिमासाहेब महाराज चौक ते तहसील कचेरी एवढ्या रस्त्यावर न्यायालय सुव्यवस्थेसाठी ‘नो पार्किंग झोन’ करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. न्यायालयापुढील रस्त्यावर गर्दी, वाहतुकीची कोंडी होऊ नये याद़ृष्टीने असा प्रस्ताव पुढे आला आहे. मात्र, ‘नो व्हेईकल झोन’ची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले.