Adoption process : दत्तक प्रक्रियेत पालकांकडून मुलांपेक्षा मुलींना अधिक पसंती, देशात महाराष्ट्र आघाडीवर

मुलांच्या तुलनेत मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण सर्वाधिक; चार वर्षांत २,८९२ चिमुकल्यांना मिळाला आई-वडिलांचा आधार
adoption
adoption
Published on
Updated on

आशिष शिंदे

कोल्हापूर : जन्मदात्या आई, वडिलांचे छत्र हरवले, म्हणून आयुष्यभर मायेपासून वंचित राहावेच लागेल असे नाही. दत्तक प्रक्रियेतून महाराष्ट्रातील हजारो चिमुकल्यांच्या आयुष्याला आई, वडिलांच्या प्रेमाची नवी ऊब मिळाली आहे. विशेष म्हणजे, 'मुलगा हवा' या पारंपरिक मानसिकतेला छेद देणारे चित्र दत्तक प्रक्रियेत दिसत आहे. पालकांकडून मुलांपेक्षा मुलींना अधिक पसंती मिळत आहे. गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रातील २,८९२ चिमुकल्यांना दत्तक घेण्यात आले असून, यामध्ये १,४९८ मुली आणि १,२९४ मुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, २०२५-२६ मध्ये एकूण ७९२ चिमुकल्यांना दत्तक घेतले असून, महाराष्ट्र दत्तक प्रक्रियेत देशात अव्वल ठरला आहे.

मुलगी म्हणून जन्माला येणे ही अडचण नव्हे, तर 'मुलगीच पाहिजे' असा मायेचा आणि आशेचा नवा संदेश महाराष्ट्राच्या दत्तक प्रक्रियेतून उमटताना दिसत आहे. २०२२-२३ ते २०२५-२६ या चार वर्षांत राज्यातील २,५२४ मुलांना देशांतर्गत, तर २७८ मुलांना परदेशात दत्तक घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या काळात देशांतर्गत असो किंवा आंतरराष्ट्रीय प्रत्येक वर्षी मुलांपेक्षा मुलींना पालकत्व मिळण्याचे प्रमाण अधिक राहिले आहे.

राज्यात देशांतर्गत दत्तक प्रक्रियेचा आलेख गेल्या चार वर्षांत लक्षणीयरीत्या वाढला आहे. चार वर्षांपूर्वीच्या तुलनेत देशांतर्गत मुले दत्तक घेण्याचे प्रमाण सुमारे ५२ टक्क्यांनी वाढले आहे. २०२५-२६ मध्ये देशांतर्गत दत्तक झालेल्या ७३० मुलांमध्ये ३७५ मुली आणि ३५५ मुले आहेत.

२७८ चिमुकल्यांना परदेशात मायेचे छत

देशाच्या सीमा ओलांडून परदेशातील कुटुंबांनीही महाराष्ट्रातील अनेक चिमुकल्यांना आपलेसे केले आहे. गेल्या चार वर्षांत २७८ मुलांना परदेशातील कुटुंबांचे मायेचे छत मिळाले. दत्तक प्रक्रियेतील प्रतीक्षा ही कायदेशीरदृष्ट्या दत्तकासाठी उपलब्ध मुलांची संख्या आणि इच्छुक पालकांनी निवडलेल्या वयोगटावर अवलंबून असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news