कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी (दि. 5) कोल्हापूर दौर्यावर येत आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुद्धा येण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या उपस्थितीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील गांधी मैदान किंवा दक्षिण मतदारसंघातील तपोवन मैदान येथे जाहीर सभा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
विधानसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. त्यानंतर राज्यभरात प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. महायुतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फोडून त्याची राज्यभर सुरुवात केली जाणार असल्याची शक्यता आहे. मंगळवारी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अमोल महाडिक यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री पवार कोल्हापूर दौर्यावर येणार असल्याचे सांगण्यात आले.
विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून आता प्रचाराचा धुरळा उडणार आहे. महायुतीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघात विजय मिळवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यानुसार शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातसह कोल्हापूर जिल्ह्यात जास्तीत जास्त सभा घेण्यावर महायुतीचा भर राहणार आहे.