

EPS Employees Retirement benefits
गुडाळ : मी सुद्धा गिरणी कामगाराचा मुलगा असल्यामुळे निवृत्तीनंतर च्या काळातील कामगारांच्या व्यथांची मला जाणीव आहे. ईपीएस 95 मधील कर्मचाऱ्यांना पुरेसे निवृत्तीवेतन मिळावे, यासाठी आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
गुडाळ (ता. राधानगरी) येथे ई पी एस 95 आंदोलनातील कर्मचाऱ्यांनी मंत्री पाटील यांची भेट घेऊन त्यांना संघटनेचे मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी ते बोलत होते.
ईपीएस कर्मचाऱ्यांचे हजारो कोटी रुपये सरकारकडे शिल्लक असूनही सहकारी संस्थांमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अतिशय तुटपुंजी पेन्शन मिळत आहे. याकडे शिष्टमंडळाने त्यांचे लक्ष वेधले. निवृत्त कर्मचाऱ्यांना किमान दहा हजार मासिक निवृत्ती वेतन मिळावे, अशी आग्रही मागणीही शिष्टमंडळाने केली.
या शिष्टमंडळात शिवाजी सावंत (खिंडी व्हरवडे ), एम टी डोंगळे (घोटवडे), शामराव चौगले (सोन्याची शिरोली), सखाराम पाटील (गुडाळ), हिंदुराव खांडेकर (खिंडी व्हरवडे), सुनील पाटील (आवळी खुर्द), बंडोपंत मोहिते (करंजफेण) आदींचा समावेश होता. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजीराव आरडे, राज्य कार्यकारणी सदस्य लहूसो जरग, पांडुरंग आवळकर हेही उपस्थित होते.