Kolhapur-Vaibhavwadi Road | सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईपर्यंत हवी; कोल्हापूर-वैभववाडी मार्गाची कुदळ मारा

कोल्हापुरात सर्किट बेंच झाले; रेल्वेच्या प्रश्नांसाठी लोकलढा हवा
Kolhapur-Vaibhavwadi Road
Kolhapur-Vaibhavwadi Road | सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईपर्यंत हवी; कोल्हापूर-वैभववाडी मार्गाची कुदळ माराPudhari File Photo
Published on
Updated on

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : मुंबई-अहमदाबाद या 508 किलोमीटर लांबीच्या मार्गावर धावण्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या एक लाख 8 हजार कोटी रुपये खर्चाची बुलेट ट्रेन धावण्याचे सोपस्कार पूर्ण होऊ लागले आहेत. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) हायड्रोजन ऊर्जेवर चालणार्‍या रेल्वेची चाचणी यशस्वी ठरली. देशात त्यावर लाखो कोटी रुपयांच्या खर्चाचे नियोजन जलदगतीने पूर्ण होत आहे; परंतु मिरज-कोल्हापूर-वैभववाडी मार्गाची मंजुरी असूनही नारळ फुटत नाही. या प्रकल्पासाठी अवघे 3 हजार कोटी रुपये लागणार आहेत. त्यामुळे रेल्वेचे पूर्व-पश्चिम जाळे भक्कम होऊ शकते आणि कोल्हापुरात प्रवेश करण्यासाठी रेल्वेचे नवे दालन खुले होऊ शकते.

कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन झाल्यानंतर त्याची निकड प्रकर्षाने जाणवू लागली आहे. यामुळे या प्रकल्पाला रेटा लावला, तर सर्किट बेंचच्या कार्यक्षेत्रातील 6 जिल्ह्यांतून नागरिकांना हक्काची सोय होऊ शकते, शिवाय या प्रकल्पामध्ये दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद आहे. म्हणूनच सर्किट बेंच झाले, आता रेल्वेसाठी जनशक्ती उभी ठाकण्याची गरज आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानकातून मुंबईला जाणार्‍या सह्याद्री एक्स्प्रेसला पुणे स्थानकात 3 वर्षे लाल सिग्नल दिल्यामुळे ती मुंबईकडे रवाना होऊ शकत नाही. कोरोना काळात कोल्हापूर - सोलापूर ही बंद झालेली रेल्वे अद्याप सुरू होत नाही. कोल्हापूरहून बंगळूरसाठी जाणार्‍या राणी चन्नम्मा एक्स्प्रेसला मिरजेहून सोडण्याचा निर्णय झाला, तो तत्कालिक होता; परंतु आता कायमस्वरूपी झाला आहे. मुंबई-कोल्हापूर वंदे भारत गाडीची कोल्हापूरकर प्रतीक्षा करत आहेत.

मिरज-पुणे रेल्वेमार्ग दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने दिला. त्याची कार्यवाही पूर्ण होत आहे; परंतु असा प्रस्ताव तयार करताना त्यांना मिरज-कोल्हापूर हा 46 किलोमीटरचा शेवटचा जोड टप्पा मात्र अंतर्भूत करावा असे वाटले नाही. रेल्वे अधिकार्‍यांनी या मार्गाला आर्थिक व्यवहार्यतेच्या कारणावरून बाजूला ठेवले. ही व्यवहार्यता त्यांना 1 लाख 8 हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणार्‍या बुलेट ट्रेनच्या प्रस्तावावेळी आवश्यक वाटली नाही.

मिरज-वैभववाडी मार्ग कोकण रेल्वेला जोडला की, आपोआप माल वाहतूक आणि प्रवासी वाहतुकीत वाढ होऊन हा मार्ग आर्थिक व्यवहार्य होऊ शकतो. कोकण रेल्वेच्या बाबतीतही याच दिल्लीच्या रेल्वे प्रशासकांनी नाके मुरडली होती; पण आता कोकण रेल्वे जीवनवाहिनी ठरली आहे. बंगळूरहून कोल्हापूरला जोडण्यासाठी नवी वंदे भारत सुरू करता येऊ शकते. या मार्गावर मोठी प्रवासी आणि माल वाहतूकही आहे. प्रश्न अनेक आहेत; पण त्यासाठी रेल्वे मार्गावर मेटा मारून बसल्याशिवाय त्याचे उत्तर सापडणार नाही.

कोल्हापूर-वैभववाडी मार्गाचे तीनवेळा सर्वेक्षण

कोल्हापूर-वैभववाडी मार्गाचे तीनवेळा सर्वेक्षण झाले. गती-शक्ती योजनेमध्ये त्याचा समावेश झाला आणि भूमिपूजनही पार पडले; परंतु कागदावरील प्रस्तावातील मार्ग प्रत्यक्षात उतरण्याची कोणतीही तयारी नाही. हा मार्ग खुला झाला, तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील नागरिकांची सर्किट बेंचला येण्यासाठी मोठी सोय होऊ शकते. सोलापूर गाडीमुळे सांगली, सोलापुरातील पक्षकारांची सोय होऊ शकते. ‘वंदे भारत’मुळे सातार्‍याहून नागरिक येऊ शकतात. जोपर्यंत कोल्हापूरकर दबावतंत्राचा वापर करीत नाहीत, तोपर्यंत कोल्हापूरच्या रेल्वे विकासाची कोंडी फुटणे अशक्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news