Chandrakant Patil | महायुतीकडे ४,४०० ठराव, आता कोणाची गरज नाही

मंत्री चंद्रकांत पाटील यांची स्‍पष्‍टोक्‍ती; आ. सतेज पाटील यांना अप्रत्‍यक्ष इशारा
Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील. File Photo
Published on: 
Updated on: 

कोल्‍हापूर : महायुतीमध्‍ये मतभेद होते पण मनभेद होणार नाहीत. मतभेदाचे गोकुळच्‍या निवडणुकीत कोणतेही नकारात्‍मक परिणाम दिसणार नाहीत. महायुतीकडे ४४०० ठराव आहेत. त्‍यामुळे निवडणुकीत आता अन्‍य कोणाला सोबत घेण्‍याची गरज नसल्‍याचे उच्‍च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्‍पष्‍ट करत काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांना अप्रत्‍यक्षरीत्‍या इशाराच दिला. तसेच महायुतीचे सर्व नेते शुक्रवारी (दि.२५) सकाळी ९ वाजता एकत्रित करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेणार असल्‍याचेही पाटील यांनी सांगितले.

महायुतीच्‍या नेत्‍यांची शहरातील एका हॉटेलमध्‍ये गोकुळ निवडणुकीतील जागा वाटपासंदर्भात बैठक झाली. बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्‍यासह महायुतीच्‍या नेत्‍यांनी प्रसार माध्‍यमांसोबत संवाद साधला. मंत्री पाटील यांनी गोकुळसाठी ५,४३२ मतदार असून यापैकी ४,४०० ठराव महायुतीकडे आहेत. ठराव संख्‍येवरून महायुतीचा एकतर्फी विजय होणार हे निश्‍चित आहे. त्‍यामुळे आता कोणी सोबत येतो म्‍हटले तरी कोणाला सोबत घेण्‍याची काहीच गरज नसल्‍याचे मंत्री पाटील यांनी स्‍पष्‍ट केले.

आज प्रचाराला सुरुवात

महायुतीचे सर्व नेते शुक्रवारी अंबाबाईचे दर्शन घेऊन गोकुळ निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. पितृपंधरवडा झाल्‍यानंतर महायुतीचा एकत्रित मेळावा होईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

माघारीपर्यंत चित्र स्‍पष्‍ट होईल

जागा वाटप ठरावांच्‍या संख्‍येनुसार होणार की नाही हे आताच सांगता येणार नाही, पण माघारीपर्यंत महायुतीमधील जागा वाटपाचे चित्र स्‍पष्‍ट होईल. जागा वाटप ठरल्‍यानतंर संबंधित पक्षाला जितक्‍या जागा मिळाल्‍या आहेत, त्‍यांचेच अर्ज राहतील. बाकीचे उमेदवार त्‍यांचे अर्ज मागे घेतील, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

बिनविरोध नाहीच, १४०० संस्‍थांची समजूत काढू : मंत्री मुश्रीफ

दरम्‍यान, जिल्‍ह्यातील एकच भाऊ आता बाजूला राहिला आहे. त्‍यांना सोबत घेणार का, असे मंत्री पाटील यांना विचारले असता मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार नाहीच, असे ठामपणे सांगितले. तसेच अवसायन कारवाईतून पात्र ठरलेल्‍या त्‍या १४०० संस्‍थांची समजूत काढली जाईल. महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्‍वास मंत्री मुश्रीफ यांनी व्‍यक्‍त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news