

Chandgad Dumper Crash Ativad Youth Death
चंदगड : आंबेवाडी (ता. चंदगड) येथील जलसंपदा विभागाच्या धरणाजवळच्या वळणावर डंपरने धडक दिल्याने दुचाकी चालक संपत हणमंत कणबरकर (वय 28, रा. अतिवाड, ता. जी. बेळगाव ) याचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत डंपर चालक वासुदेव कृष्णनंद आळवे (वय 39, रा. कोनवाळ कट्टा, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) याच्यावर चंदगड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संपत हा मंडप डेकोरेटर व इलेक्ट्रिशियनचे काम करत होता. तो नवीन काम बघण्यासाठी पाटणे फाटा ते मोटणवाडी यादरम्यान प्रवास करत होता.
याचवेळी सकाळी नऊनंतर समोरून दोडामार्ग येथून आलेल्या डंपरने धडक दिली. यात संपतचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. त्याचा भाऊ यशवंत हणमंत कणबरकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, भावजय असा परिवार आहे. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल वसीम देसाई करत आहेत.