

Chakkajam agitation was held today by all parties against the height of Almaty Dam
जयसिंगपूर/उदगाव : पुढारी वृत्तसेवा
कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घातलेला घाट जीव गेला तरी पूर्ण होऊ देणार नाही. वडेनरे समितीने दिलेल्या अहवाल चुकीचा असून हा रिपोर्ट रद्द करा. पश्चिम महाराष्ट्राला या महापुराच्या विळख्यातून बाजूला काढा. यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी एकत्रितपणे अलमट्टीच्या उंची वाढीचा निर्णय हाणून पाडा अशी एकजूट मागणी सर्वपक्षीयांनी केली.
उदगाव (ता. शिरोळ) येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावर सर्वपक्षीयांच्यावतीने अलमट्टी उंची वाढीच्या विरोधात आज (रविवार) सकाळी दहा वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तब्बल ३ तासानंतर पाटबंधारे विभागाने बुधवार दि 21 रोजी मुंबई येथे मंत्रालयात पाटबंधारे मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक घेणार असल्याचे पत्र दिल्यानंतर हे चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, धनाजी चुडमुंगे, पी एम पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, डॉक्टर नीता माने, आमदार राहुल आवाडे, खासदार विशाल पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, सावकार मादनाईक, माजी आमदार राजू बाबा आवळे, दत्तचे गणपतराव पाटील, आमदार जयंत आसगावकर, सर्जेराव पाटील, आमदार विश्वजीत कदम, फोनवरून राजू शेट्टी यांनी अलमट्टी उंची वाढीला विरोध करून आपली भूमिका मांडली. यावेळी सांगली कोल्हापूर सातारा या तीन जिल्ह्यातील पदाधिकारी शेतकरी पूरग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उदगाव येथील टोल नाक्यावर सर्वपक्षीयांनी चक्काजाम आंदोलन केल्याने सांगली-कोल्हापूर महामार्गावरील सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने सोडल्याने विस्कळीत झाली होती. यामुळे अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
अलमट्टी उंचीला सर्वांचा विरोध असून सरकारने यावर कठोर निर्णय घेतला नाही, तर लवकरच कोगनोळी तालुका निपाणी येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखून सरकारला शेतकऱ्यांची व पूरग्रस्तांची ताकद दाखवू असाही निर्णय घेण्यात आला.