

कोल्हापूर : बाळाचे गुण माहिती होते म्हणूनच पहिली संधी दिली नाही. चंचल प्रवृत्तीची माणसं कधीच यशस्वी होत नाहीत, असा खरपूस समाचार घेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वांना मान्य होईल, असा चेहरा गोकुळ अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आला असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा सन्मान राखण्यासाठी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मात्र अरुण डोंगळे यांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही. त्यांना राजीनामा द्यावाच लागेल, असेही ते म्हणाले.
गोकुळ अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास अरुण डोंगळे यांनी नकार दिल्यामुळे सत्तारूढ आघाडीमध्ये अस्वस्थता आहे. डोंगळे यांची समजूत काढण्यासाठी नेत्यांनी संचालकांवर जबाबदारी सोपविली होती. परंतु त्यांनी आपल्या राजीनाम्याचा प्रश्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्तरावर असल्यामुळे त्यांनी सांगितल्यास राजीनामा देऊ, अशी भूमिका घेतल्यामुळे चर्चा थांबली आहे. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांची भेट घेतली असता ते म्हणाले, अरुण डोंगळे यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. ते देतोही म्हणाले होते. परंतु आता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे नाव सांगत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा सन्मान राखण्याकरिता मंगळवारी (दि. 20) मुंबईत आपण व आमदार सतेज पाटील त्यांची भेट घेणार आहे. त्यांना आम्ही वस्तुस्थिती समजावून सांगू. यातून निश्चित मार्ग निघेल.
गोकुळचे नुकसान होऊ नये म्हणून डोंगळे यांचा लवकर राजीनामा व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावयाचा असेल किंवा धोरणात्मक बाब ठरवायची असेल तर त्याला संचालकांची मंजुरी लागते. आज त्यांच्यासोबत एकही संचालक नाही, असे सांगून मुश्रीफ म्हणाले, डोंगळे यांनी राजीनामा न देण्याच्या मागे खुर्चीची हाव हीच अद़ृश्य शक्ती आहे. दुसरे कोणी नाही. आणखी एक वर्ष हवे होते तर किमान आमच्याशी चर्चा तरी करायची. महायुतीच्या नेत्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारही आहेत. त्यांना डोंगळे का भेटले नाहीत? त्यांना नवीन सारीपाट मांडावयाचा होता तर आता ती वेळ नाही. नवीन निवडणुकीत त्यांनी तो मांडावा.
अध्यक्षपदासाठी प्रथम संधी मागत होते. परंतु बाळ किती गुणाचे आहे हे माहिती असल्यामुळे आम्ही ते टाळले. महायुतीचा त्यांना अध्यक्ष हवा आहे. त्यासाठी डोंगळेंसह सर्वांना मान्य होईल, असा चेहरा अध्यक्षपदासाठी निश्चित केला आहे. त्यामुळे डोंगळे यांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
पंधरा दिवसांपूर्वी डोंगळे यांनी राजीनामा देण्याच्या दिवशी सर्व प्रमुख नेते मंडळींना उपस्थित ठेवण्याबाबत सांगत होते. त्याचवेळी आपल्या मनात शंकेची पाल चुकचुकली, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांची जिल्हा बँकेत बंद खोलीत सुमारे पंधरा ते वीस मिनिटे चर्चा झाली. चर्चेचा तपशील समजू शकला नाही. ही चर्चा बँकेच्या कामकाजासंदर्भात असल्याचे पाटील यांनी सांगितले.