

गुडाळ : राधानगरी तालुक्यातील कांबळवाडीचा सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय नेमबाजपट्टू स्वप्निल कुसाळे यांने आज (दि.१) पॅरिसमध्ये ऑलिंपिक पदकाला गवसणी घालताच त्याचे जन्मगाव कांबळवाडी सह राधानगरी तालुक्यात ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. Paris (Olympics Swapnil Kusale)
स्वप्निलने अंतिम फेरी गाठल्यापासून गेले दोन दिवस राधानगरी तालुक्यात स्वप्निलच्या यशासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रार्थना करण्यात येत होत्या. तालुक्यात हजारो तरुणांच्या मोबाईलवर स्वप्निल ला शुभेच्छांचे स्टेटस लावण्यात आले होते. कांबळवाडी ग्रामस्थांनी आज सकाळीच ग्रामदैवत ज्योतिर्लिंगाला अभिषेक करून स्वप्नील च्या यशाचे साकडे घातले. परिसरातील अनेक गावात ही स्थानिक देवतांना अभिषेक घालण्यात आले. धामोड येथील नवणे हायस्कूलच्या शेकडो विद्यार्थ्यांनी आज सकाळी सामूहिक विश्व प्रार्थना करून स्वप्निलच्या यशाबद्दल साकडे घातले. स्वप्निलने कांस्यपदक पटकाविल्याचे दूरचित्रवाणीवर पाहिल्यानंतर कांबळवाडी आणि परिसरातील तरुणांनी गावागावातून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. (Olympics Swapnil Kusale)
लहानपणापासून खेळानिमित्त घराबाहेर राहिलेल्या स्वप्निलचे कष्ट, जिद्द, चिकाटी या गुणामुळे तो निश्चितपणे ऑलम्पिक पदकाला गवसणी घालेल, असा आम्हाला विश्वास होता, अशी प्रतिक्रिया स्वप्निल चे वडील सुरेश कुसाळे आणि मातोश्री अनिता कुसाळे यांनी 'दै. पुढारी' शी बोलताना व्यक्त केला. (Olympics Swapnil Kusale)
कांबळवाडी येथील कुसाळे यांच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी लोकांची रिघ लागली होती. स्वप्निलच्या आई-वडिलांसह, लहान भाऊ सुरज, चुलते शिवाजी कुसाळे, आजोबा महादेव कुसाळे, आजी तुळसाबाई कुसाळे उत्साहाने सर्वांचे स्वागत करून शुभेच्छा स्वीकारत होते.