मुरगूड, पुढारी वृत्तसेवा : संताजी घोरपडे साखर कारखाना उभारणीसाठी सभासद, भागधारक शेतकर्यांकडून प्रत्येकी दहा हजार प्रमाणे शेअर्स भांडवल घेतले. यामध्ये 40 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार विवेक विनायक कुलकर्णी व अन्य 16 जणांनी मुरगूड पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार आ. हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, आ. मुश्रीफ समर्थकांनी मुरगूड पोलिस ठाण्याला गराडा घालून यास तीव्र आक्षेप घेतला आहे. कुलकर्णी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, सन 2012 च्या दरम्यान, व्यक्तिगत संपर्कातून साखर कारखाना उभारणीसाठी आ. मुश्रीफ यांनी खुले आवाहन करून लोकांकडून दहा हजार रुपयांप्रमाणे शेअर्स भांडवल घेतले. पण या संबंधातील कोणतीही पावती व शेअर्स सर्टिफिकेट दिले नाही.
चौकशीसाठी घोरपडे साखर कारखाना हा केवळ मुश्रीफ कुटुंबीय व अन्य नातेवाईक अशा एकूण 17 जणांचा कारखाना असल्याचे दिसून येते. असे असताना, मुश्रीफ यांनी राजकीय पदांचा गैरफायदा घेत गोरगरीब व शेतकर्यांची 40 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या फिर्यादीनुसार व जिल्हा पोलिस प्रमुखांच्या आदेशाने आपण गुन्हा दाखल केल्याचे मुरगूडचे सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी सांगितले. आ. मुश्रीफांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे समजताच मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील आदी मुरगूड पोलिस ठाण्यासमोर जमले होते. त्यांनी या घटनेचा निषेध केला.
तक्रारीची शहानिशा न करताच गुन्हा कसा दाखल केला? राजकीय सूडापोटी हे कृत्य केले आहे याची आपणास माहिती नाही का? अशी विचारणा करीत, आमचीही समरजित घाटगेंविरुद्ध तक्रार आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी कागल तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विकास पाटील, शहर अध्यक्ष रणजित सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, देवानंद पाटील आदींनी सपोनि बडवे यांच्याकडे केली आहे.