कोल्हापूर : सीपीआरमधील हृदयशस्त्रक्रिया विभागात सुरू झाली लगबग

कोल्हापूर : सीपीआरमधील हृदयशस्त्रक्रिया विभागात सुरू झाली लगबग

कोल्हापूर : सार्वजनिक सेवा-सुविधांवर कोट्यवधी रुपये खर्च करून सर्वसामान्यांना सुविधांची दारे केवळ खुली करून चालत नाहीत, तर त्या सुविधांच्या वापरावरही डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागते. दै. 'पुढारी'ने सीपीआरमधील हृदयशस्त्रक्रिया विभागाच्या कारभारावर कडी नजर ठेवली. तेथील गलथान कारभारावर प्रकाश टाकणारा एक धक्का दिला. यामुळे या विभागात बंद पडत आलेल्या शस्त्रक्रियांचे आवर्तन पुन्हा एकदा उलटे फिरू लागले आहे. दै. 'पुढारी'च्या दणक्यानंतर आता हृदयशस्त्रक्रिया विभागाचे किलकिले होऊ पाहणारे दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे हृदयशस्त्रक्रिया विभागात लगबग सुरू झाली आहे.

गेल्या महिनाभरात आठ रुग्णांना बायपास शस्त्रक्रियांचा लाभ घेता आला, तर अन्य तीन रुग्णांपैकी दोन रुग्णांवर हृदयपटलाची, तर एका रुग्णावर हृदयाकडे जाणार्‍या रक्तवाहिनीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. महाविद्यालयीन अधिष्ठातांनी लक्ष घातले असते, तज्ज्ञ डॉक्टर्सना कामाला लावले असते, तर अशा शस्त्रक्रिया यापूर्वीही झाल्या असत्या. 'पुढारी'ने त्याकडे लक्ष वेधल्यामुळे किमान गोरगरिबांचे लाखो रुपये वाचू लागले आहेत. शिवाय शासकीय योजनेमुळे रुग्णालयालाही उपचार खर्चाचा परतावा मिळतो आहे.

कोल्हापुरात 25 वर्षांपूर्वी हृदयशस्त्रक्रिया विभागाची मुहूर्तमेढ रोवली गेली. तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या आग्रहाखातर आणि मायमातीच्या प्रेमापोटी मुंबईचे प्रसिद्ध हृदय शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत कोले यांनी विख्यात बॉम्बे हॉस्पिटलची सेवा सोडून कोल्हापुरात रुग्णसेवेसाठी जीव झोकून दिला होता. तेव्हा महिन्याला 15 हून अधिक शस्त्रक्रिया होत होत्या. नव्या उपकरणांसाठी निधी मिळविणे तितके सोपे नव्हते. अत्याधुनिक साधनांची जोड नव्हती. तरीही महाराष्ट्रातून शस्त्रक्रिया नाकारलेले अनेक रुग्ण कोल्हापुरात उपचारासाठी आले आणि जीवनदान मिळवून परतले. पण याच विभागावर काही वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च झाले.

कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती झाली, तरी प्रगतीचा आलेख मात्र खाली आला. हा विभाग रुग्ण पळवापळवीचे केंद्र बनला. येथे उपचार होत नाहीत, असा शेरा केस पेपरवर मारून त्याच रुग्णांच्या शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात होऊ लागल्या. महिन्याला दोन शस्त्रक्रिया दुरापास्त झाल्या आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सहयोगी कर्मचार्‍यांवर हाताची घडी घालून बसण्याची वेळ आली. याच पार्श्वभूमीवर शासनाने 50 कोटी रुपयांचा नवा निधी जाहीर केल्यानंतर दै. 'पुढारी'ने या विभागातील डॉक्टर्स आणि कर्मचार्‍यांना शिस्त लावण्याची गरज प्रतिपादित केली होती. त्याचा दणका बसला आणि आता दररोज शस्त्रक्रिया विभागात लगबग सुरू झाली आहे.

प्रशासकीय गलथानपणा किती असू शकतो? हृदयशस्त्रक्रिया विभागात डॉक्टर श्रीकांत कोले जेव्हा आपली सेवा देत होते, तेव्हा शस्त्रक्रिया पश्चात उपचारासाठी तेथे व्हेंटिलेटर्सची सुविधा असलेले आठ बेड सज्ज होते. पण कालांतराने दुर्लक्षामुळे अवघे दोन बेड शिल्लक राहिले आणि व्हेंटिलेटर्स बेड नसल्याचे कारण सांगून रुग्णांची रवानगी खासगी रुग्णालयात सुरू झाली. याचवेळी सर्जिकल भांडारामध्ये व्हेंटिलेटर्स धूळ खात पडून होते. काही व्हेंटिलेटर्सची पॅकिंगही फोडण्यात आली नव्हती. दै. 'पुढारी'ने कोरोना काळात हा प्रकार चव्हाट्यावर आणला. त्यावर चौकशी समिती नियुक्त झाली. पण समित्यांनी 'नरो वा कुंजरो वा' भूमिका घेतली. लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने घेतले नाही. यामुळे सर्वसामान्यांचे खिसे कापले गेले. आता सुविधा मिळू लागल्या आहेत. पण त्या कायम राहण्यासाठी डोळ्यात तेल घालण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news