वडणगे : पुढारी वृत्तसेवा : 'ताई, माई, आक्का विचार करा पक्का ….', 'येऊन -येऊन येणार कोण आमच्या शिवाय हाय कोण'… पंधरा ते वीस वर्षांपूर्वी मोबाईल व इंटरनेटचा प्रसार झाला नव्हता. तेव्हा ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात ग्रामीण भागातील गल्लो-गल्लीत प्रचाराच्या अशा आरोळ्या ऐकायला येत होत्या. त्या काळात प्रचारासाठी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी, पदयात्रा हेच उमेदवारांकडे पर्याय होते. सध्याच्या इंटरनेट युगात स्मार्टफोनमुळे गाव खेड्यातील हा प्रचार हायटेक बनला आहे.
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त प्रचाराचा धुरळा उडाला आहे. करवीर तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटींसह उमेदवार व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून मतदारांना कॅश करण्यासाठी सोशल मीडिया प्रचारासाठी खुबीने वापर होताना दिसत आहे. आज खेड्यापाड्यातील तरुणांपासून- आबालवृद्धांपर्यंत, शेतकऱ्यांपासून महिला वर्गापर्यंत स्मार्टफोन पोहोचला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवारांकडून फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम या सोशल मीडिया माध्यमांचा वापर होताना दिसत आहे.
गावा- गावात समर्थक कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचाराचे हायटेक नियोजन केले आहे. यात त्यांनी प्रभागनिहाय प्रचाराचे वेळापत्रक त्या-त्या समर्थक कार्यकर्त्यांच्या व्हाॅट्स ॲप ग्रुपवर शेअर करून प्रचार केला जात आहे. प्रचाराच्या लक्षवेधी टॅगलाईन, बॅकग्राऊंड म्युझिकसह उमेदवारांच्या आकर्षक फेसबुक पोस्टस, स्टोरीज, फेसबुक रिल्स शेअर होत आहेत. या फेसबुक पोस्ट बनवताना हिट ठरलेल्या काही जुन्या हिंदी, मराठी चित्रपटातील डायलॉगचाही प्रचारासाठी तंतोतंत वापर केला आहे.
जास्तीत जास्त तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुक पोस्ट जास्तीत- जास्त फ्रेंड्स व ग्रुपला टॅग केल्या जात आहेत. अगदी शेताच्या बांधावर बसूनही काही शेतकरी सोशल मीडियातील या प्रचाराचा अनुभव घेत आहेत. समर्थक कार्यकर्ते व मतदारांचे व्हाॅट्स ॲप ग्रुप बनवून रोज नवनवीन व लक्षवेधी प्रचाराच्या पोस्ट व स्टेटस व्हाॅट्स अपवर व्हायरल केले जात आहेत. तरुण मतदारांमध्ये इंस्टाग्रामची क्रेझ जास्त असल्याने इंस्टाग्रामचाही प्रचारासाठी वापर होत आहे. सोशल मीडियाद्वारे मतदारांपर्यंत आपल्या उमेदवाराची रोज नवीन पोस्ट व्हायरल होण्यासाठी उमेदवारांच्या निवडणूक वॉर ममध्ये कार्यकर्त्यांची टीम कार्यरत आहे.
प्रचारासाठी सोशल मीडियाच्या वापरामुळे मतदारांनाही आपल्या प्रभागातील व अन्य प्रभागातील उमेदवारांची अपटूडेट माहिती घरबसल्या मिळत आहे. काही व्हाॅट्स ॲपग्रुपवर निवडणुकीची चर्चा नको व वाद- विवाद टाळण्यासाठी ग्रुप ॲडमिननी आपले ग्रुप ओन्ली ॲडमिन मोडवर ठेवले आहेत. एकूणच सोशल मीडियामुळे यावेळच्या निवडणुका वेगळ्या ठरल्या आहेत.
हेही वाचा :