

Electric Shock Cable Operator Death in Nagav
शिरोली एमआयडीसी : नागाव (ता. हातकणंगले) येथे केबल ऑपरेटरचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. अतुल तानाजी कदम (वय ३२) असे मृताचे नाव आहे. ही घटना आज (दि.६) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद शिरोली पोलिसांत उशिरापर्यंत झाली नव्हती.
घटनास्थळावरून व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, अतुल याने कोल्हापूर येथील एका चॅनेलची केबल एजन्सी तीन वर्षांपूर्वी घेतली होती . त्याने गावातील अनेक घरात त्याचे कनेक्शन दिले होते. केबल ज्या घरावरून गेली होती. त्या घराचे बांधकाम सुरू असल्याने घर मालकाने अतुल व अन्य एका कंपनीच्या ऑपरेटर (मालक ) यांना केबल काढून घेण्यासाठी सांगितले होते.
अतुल कामगारासह ती केबल काढत होता. अतुल हा स्वतःच केबल ओढून काढत होता. यावेळी वरून गेलेल्या २१ केव्हीच्या उच्च दाब विद्युत तारेला त्याच्या हाताचा स्पर्श झाला. त्यामुळे जोराच्या धक्क्याने तो जागेवर कोसळला. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.