शहर हद्दवाढीविरोधात 19 गावांत व्यवहार बंद, निषेध फेर्‍या

उचगाव, गांधीनगर, गडमुडशिंगी, वळिवडे, शिरोली, वडणगेसह सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद; बंद शांततेत
Black flags were displayed in Uchgaon to protest the extension.
उचगाव येथे काळे झेंडे दाखवून हद्दवाढीला विरोध दर्शवण्यात आला.pudhari Photo

उचगाव : उचगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. कोल्हापूर शहर हद्दवाढ सर्वपक्षीय विरोधी कृती समितीचे अध्यक्ष पैलवान मधुकर चव्हाण यांनी बंदचे आवाहन केले होते. गावातून हद्दवाढविरोधी फलक व काळे झेंडे घेऊन हद्दवाढीचा निषेध नोंदवत श्री मंगेश्वर मंदिर ते कमानीपर्यंत ग्रामस्थांनी जनजागृती फेरी काढली. हद्दवाढीचा निषेध नोंदवत सरपंच मधुकर चव्हाण, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) राजू यादव, दिनकर पोवार, दत्तात्रय यादव, संजय चौगुले-वतनदार आदींनी मनोगत व्यक्त केले.

Black flags were displayed in Uchgaon to protest the extension.
कोल्हापूर हद्दवाढ प्रश्न मार्गी लागणार!

बंदच्या आवाहनासाठी उपसरपंच तुषार पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष उमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य विराग करी, श्रीधर कदम, अरविंद शिंदे, छत्रपती सेवा सोसायटी चेअरमन बाळासो मन्नाडे, अजित पाटील, सचिन नागटिळक सहभागी झाले. सरनोबतवाडी येथेही शहर हद्दवाढीला विरोध करत कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व व्यवहार बंद ठेवून ग्रामस्थांनी उत्स्फूर्त दिला.

गांधीनगरमधील सर्व दुकाने बंद

गांधीनगर : गांधीनगर बाजारपेठेसह गडमुडशिंगी, वळिवडे येथे कडकडीत बंद शांततेत पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद राहिल्या.गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे, उपसरपंच पूनम परमानंदानी व सर्व पदाधिकारी व सदस्यांनी ग्रामस्थांना बंदचे आवाहन करण्यासाठी फेरी काढली. तावडे हॉटेलपासून चिंचवाड रेल्वे फाटकापर्यंत विस्तारलेल्या संपूर्ण बाजारपेठेतील होलसेल व रिटेल दुकाने बंद राहिली.

वळिवडेत निषेध सभा

वळिवडे : लोकनियुक्त सरपंच रूपाली रणदितसिंह कुसाळे, उपसरपंच भैया इंगवले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर जनजागृती सभा घेऊन हद्दवाढीचा निषेध केला. वळिवडे मेन रोडसह गावातील सर्व दुकाने, संस्था यांनी सहभाग घेऊन कडकडीत बंद पाळला.

पाचगाव, कळंब्यात बंदला प्रतिसाद

पाचगाव : पाचगाव, कळंब्यासह परिसरात हद्दवाढविरोधी आंदोलनाला ग्रामस्थ व व्यापार्‍यांनी पाठिंबा देत सर्व व्यवहार बंद ठेवले. पाचगावच्या सरपंच प्रियांका संग्राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे प्रतिनिधी, ग्रामस्थांतर्फे गाव बंद यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले. कळंब्यात सरपंच सुमन गुरव यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दवाढविरोधी जनजागृती करून फेरी काढली. कळंब्याच्या सरपंच सुमन गुरव, नितीश शिंदे, सचिन पाटील, संजय शिंदे, संग्राम पोवाळकर, अमित कदम, दीपाली गाडगीळ यांनी मत व्यक्त केले. मोरेवाडीतही बंदला प्रतिसाद मिळाला. यावेळी सरपंच ए. व्ही. कांबळे, उपसरपंच संजय वास्कर आदींनी बंदचे आवाहन केले होते.

पिरवाडीमध्ये रॅली काढून निषेध

वाशी : पिरवाडी ग्रामस्थांनी गावातील सर्व व्यवहार ठप्प ठेवून शासनाच्या हद्दवाढ धोरणाच्या विरोधात निषेध फेरी काढून विरोध केला. यावेळी सरपंच शुभांगी मिठारी, उपसरपंच यशवंत सातपुते, युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष कृष्णात धोत्रे, पोलिस पाटील राजश्री जाधव, ग्रामपंचायत सदस्य सागर लाड, उत्तम शेळके, सूर्यकांत लाड, सागर टेळके, संदीप मिठारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

शिरोलीत 100 टक्के बंद

शिरोली पुलाची : शिरोली ग्रामपंचायतीने कोल्हापूर हद्दवाढीविरोधात पुकारलेल्या सर्वपक्षीय शिरोली बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. गावातील व्यापारी व अन्य व्यावसायिकांनी सर्व दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा व्यक्त केला. सरपंच पद्मजा करपे म्हणाल्या, शासनाच्या विविध फंडातून शिरोलीतील विकासकामे करण्यास आम्ही सक्षम आहोत.

हद्दवाढीच्या निषेधार्थ प्रसंगी आत्मदहन

गडमुडशिंगी : हद्दवाढीच्या विरोधात प्रसंगी आत्मदहन करू; पण कदापि हद्दवाढ होऊ देणार नाही, असा इशारा सरपंच अश्विनी शिरगावे यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्र्यांना दिला. हद्दवाढविरोधी कृती समितीच्या आवाहनानुसार गाव बंद राहिले. सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. हद्दवाढीच्या निषेधार्थ जागोजागी फलक उभारून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. हद्दवाढीबाबत ग्रामस्थांची घरोघरी जाऊन ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी जनजागृती केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news