कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : किणी (ता. हातकणंगले) येथे शनिवारी रात्री सात ठिकाणी बंद घरांची कुलपे तोडत 25 हजारांच्या रोकडसह, दुचाकी, सोन्या-चांदीचे दागिने असा दोन लाखांचा ऐवज लंपास केला.
शनिवारी रात्री ग्रामपंचायत सदस्या रेश्मा मुजावर यांच्या घरी खिडकीतून हात घालून दार उघडण्याचा प्रयत्न करत असताना चोरट्यांचा हाती एका स्पोर्टस् मोटारसायकलची चावी लागली. दीड लाख रुपये किमतीची मोटारसायकल घेऊन चोरटे पसार झाले. दुसर्या मोटारसायकलचे लॉक तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर सुलतान खाटीक यांचे ऑफिसमधील टेबलचे ड्रॉवर तोडण्यात आले, तसेच सिकंदर शेख यांच्या बंद घराचे कुलूप तोडण्यात आले;
मात्र दोन्ही ठिकाणी काही हाती लागले नाही. त्यानंतर महामार्गालगत राहणारे सुनील वडर यांच्या घरातील सर्वजण एका रूममध्ये झोपले होते. मुलगा रात्रपाळीस कामावर गेल्याने दुसर्या रूमला कुलूप होते. ते कुलूप तोडून कपाटातील साहित्य विस्कटून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम पंचवीस हजार लंपास केली. एक धान्य दुकान व आणखी दोन ठिकाणीही चोरीचा प्रयत्न झाला पण चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. दरम्यान वडगाव पोलिसांसह ठसे तज्ज्ञ व श्वानपथकाद्वारे चोरट्यांचा माग काढण्यात आला.