गॅस पाईपलाईनचे काम ढपल्यासाठी अडकले?

गॅस पाईपलाईनचे काम ढपल्यासाठी अडकले?
Published on
Updated on

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : कोल्हापुरात उपनगरीय भागांमध्ये गॅस पाईपलाईनचे काम पूर्णत्वाकडे निघाले असताना शहराचा सर्वाधिक गजबजलेला भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या राजारामपुरी उपनगरामध्ये गॅस पाईपलाईनच्या कामाला ब्रेक लागला आहे. या ब्रेकला ढपला कारणीभूत असल्याची दबल्या आवाजात चर्चा आहे. यामध्ये प्रशासनाने लक्ष घालून तातडीने काम सुरू केले नाही तर ऐन पावसाळ्यात उकरलेल्या रस्त्यांवरून नागरिकांना प्रवास करावा लागेल, अथवा पावसाळ्याचा मोठा विलंब यामुळे हा प्रकल्प आणखी 9 महिने लांबणीवर पडू शकतो.

राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सिलिंडरऐवजी पाईपलाईनमधून गॅसपुरवठा करण्याचे शासनाचे धोरण आहे. यासाठी मोठी टेंडर्स काढण्यात आली आणि पुणे, मुंबई, नाशिक, संभाजीनगर, नागपूर अशा शहरांमध्ये या योजना कार्यान्वितही झाल्या. परंतु, कोल्हापूर शहरात योजना मंजूर असूनही त्याच्या प्रवासातील अडथळे सध्या सार्वजनिक चर्चेचे विषय बनताहेत. महापालिका प्रशासनाने शहरातील गॅस पाईपलाईनच्या कामाचे नियोजन करताना सर्वप्रथम उपनगरीय भागांना प्राधान्य दिले.

उपनगरीय भागांत तुलनेने रहदारी कमी आणि रस्त्यांची रुंदी जास्त यामुळे हे काम वेगाने पूर्ण होईल, असा कयास बांधण्यात आला होता. हे काम पूर्ण झाल्यानंतर शहराच्या गावठाण भागामध्ये दुसर्‍या टप्प्यात गॅस पाईपलाईनचे जाळे विस्तारले जाणार आहे. महापालिकेच्या नियोजनानुसार नागाळा पार्क, ताराबाई पार्क आदी उपनगरीय भागांमध्ये पाईपलाईन सज्ज झाली; पण राजारामपुरीमध्ये मात्र या योजनेचे घोडे अडकले आहे. सर्वात विशेष म्हणजे महापालिकेची सार्वत्रिक सभा सध्या बरखास्त आहे. महापालिकेवर प्रशासकीय कारभार सुरू आहे. असे असतानाही त्या त्या भागांमध्ये निर्माण झालेल्या म्होरक्यांनी आपल्या मनगटशाहीच्या जोरावर ही कामे अडविल्याचे समजते. यामुळे या म्होरक्यांना हात कोण लावणार? असा प्रश्न आहे.

कोल्हापूर शहरामध्ये चोहोबाजूने पेठा, गल्ल्या, प्रभाग यामधील स्वयंघोषित नेते सध्या कोल्हापूर शहराच्या विकास कामांतील मोठा अडथळा बनत असल्याचा अनुभव आहे. यापूर्वी कोल्हापूर शहरातील विद्युत वाहिन्या जमिनीखालून टाकण्याचा एक प्रस्ताव वीज मंडळाकडून मंजूर झाला होता. सुमारे 30 कोटी रुपयांच्या कामाचा निधी उपलब्धही झाला. वीज मंडळाने या निधीतून शहराच्या प्रमुख गणेश विसर्जन मार्गावरील विद्युत वाहिन्यांचे अडथळे दूर करून संबंधित वाहिन्या जमिनीखालून टाकण्याचा प्रस्ताव तयार केला. हा पथदर्शी प्रकल्प होता. यामुळे शहराच्या प्रमुख मार्गांवरील विजेचे खांब, लोंबकळणार्‍या तारा सार्‍या दूर होऊन शहर सुशोभीकरणाला हातभार लागू शकला असता.

पावसाळ्यामध्ये विद्युत प्रवाहात होणारे अडथळे दूर करण्यासाठी विद्युत कर्मचार्‍यांच्या कामामध्ये सुलभता आली असती. परंतु, हे काम केवळ ढपल्यासाठी होऊ शकले नाही, असे वीज मंडळाच्या जबाबदार अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

'ढपल्या'शिवाय काम सुरू करू न देण्याची दमबाजी

कंत्राटदाराला 'ढपला' टाकल्याशिवाय काम सुरू करू देणार नाही, अशी दमबाजी झाली. यामधून निधीही परत गेला आणि कामही झाले नाही. आता गॅस पाईपलाईनमध्ये अडथळे उभे राहू लागले आहेत. दुसर्‍या टप्प्यात शहरातील गावठाण भागांमध्ये या अडथळ्यांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच त्याचा बंदोबस्त करण्यासाठी जर पावले उचलली नाहीत, तर कोल्हापूरचा विकास कागदावरून खाली उतरणे अशक्य आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news