

कोल्हापूर/मुंबई/नाशिक : ठाणे, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातार्यासह राज्यातील तब्बल २२ न्यायालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने सोमवारी (दि. २) खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर सर्वच जिल्हा सत्र न्यायालयांत तातडीने सुरक्षा यंत्रणा सतर्क करून कसून तपासणी करण्यात आली. मात्र, तपासणीत बॉम्बसदृश किंवा संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनासह न्यायालयीन यंत्रणांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळपासून वेगवेगळ्या वेळेत धमकीचे ई-मेल संबंधित जिल्हा न्यायालयांच्या मेल आयडीवर प्राप्त झाले. सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस असल्याने सर्वच जिल्हा न्यायालयांत सकाळपासूनच गर्दी होती. न्यायालयीन कामकाजासाठी न्यायाधीश, वकील, फिर्यादी, पक्षकार तसेच विविध कामांसाठी पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यातच दिवाळीच्या सुट्ट्या जवळ आल्याने प्रलंबित कामांच्या निपटार्यासाठी न्यायालयांत लगबग सुरू होती. अशा परिस्थितीत एकाच वेळी २२ न्यायालयांना बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर येताच या न्यायालयांच्या परिसरात धांदल उडाली.
शहरात सुरक्षा यंत्रणा सतर्क
एकाच वेळी २२ न्यायालयांना धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने सुरक्षा यंत्रणांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले. सर्व तपासण्यांअंती ही अफवा ठरली असली, तरी धमकीचा ई-मेल नेमका कोठून आला व तो कोणी पाठविला, याचा तपास केला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.