भाजपकडून छत्रपती शिवरायांच्या विचारांचे संविधान संपवण्याचा प्रयत्न : राहुल गांधी
पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंदुस्तानात दोन विचारधारांची लढाई सुरू आहे. एक विचारसरणी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारी, संविधानाचे रक्षण करणारी तर दुसऱी विचारधारा शिवाजी महाराजांच्या विचारांचे संविधान संपवण्याच्या विचारांची आहे. विचारधारा अंमलात आणणार नसाल तर पुतळा उभारण्याला अर्थ नाही. शिवरायांचे विचार पाळले नाहीत म्हणून सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपवर केली. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे (Chhatrapati Shivaji Maharaj) अनावरण आज (दि. ५) राहुल गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) बहुशस्त्रधारी भव्य पुतळा साकारला आहे. या पुतळ्याचे अनावरण आज राहुल गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, शिवाजी महाराज ज्या विचारसरणीच्या विरोधात लढले त्याच विचारसरणीविरोधात आज काँग्रेस पक्ष लढत आहे. भाजपने शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला आणि काही दिवसांनी पुतळा कोसळला, कारण त्यांचा हेतू चुकीचा होता. शिवाजी महाराजांचा पुतळा बनवायचा असेल तर तुम्हाला शिवाजी महाराजांच्या विचारसरणीचे रक्षण करावे लागेल, असा संदेश भाजपला त्यातून दिला आहे. भाजपची विचारधाराच चुकीची आहे. त्यांनी आदिवासी राष्ट्रपतींना राम मंदिर आणि संसदेच्या उद्घाटनाला येऊ दिले नाही. हा राजकीय लढा नसून विचारधारेचा लढा आहे, असे राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले.
जेव्हा आपण पुतळा बनवतो तेव्हा त्या व्यक्तींची विचारधारा त्या व्यक्तींच्या कामाचा मनापासून स्विकार करतो. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना ते जसे लढले, जसे जीवन जगले तसे त्यांचे थोडे तरी विचार आपण घेतले पाहिजेत, असेही राहुल गाधी म्हणाले.