Bishnoi Gang | बिष्णोई टोळीचे दोन गँगस्टर गजाआड

कसबा बावडा कोर्ट आवारात पुनियासह साथीदारावर पोलिसांची वेशांतर करून झडप
Bishnoi Gang |
Bishnoi Gang | बिष्णोई टोळीतील गुंडांचे कोल्‍हापुरात आठ दिवसांपासून वास्‍तव्‍य (File Photo)
Published on
Updated on

कोल्हापूर : राजस्थान, गुजरातसह हरियाणात दहशतीचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या कुख्यात आंतरराष्ट्रीय बिष्णोई टोळीचा गँगस्टर आणि खून, खंडणी वसुलीसह अपहरणाच्या गुन्ह्याचे रेकॉर्ड असलेल्या शामलाल गोवर्धनराम पुनिया (२९, रा. जमसागर भियासार, जि. फलोदी, राजस्थान) याच्यासह साथीदाराच्या कोल्हापूर पोलिसांनी शुक्रवारी मुसक्या आवळल्या. कसबा बावडा येथील जिल्हा न्याय संकुल आवारात वेशांतर करून पोलिस पथकाने थरारनाट्य घडविले. संशयिताच्या ताब्यातून आलिशान मोटार हस्तगत करण्यात आली आहे.

श्यामलाल पुनिया याने २८ जानेवारी २०२० रोजी किणी नाक्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे तत्कालीन निरीक्षक तानाजी सावंत, हवालदार नामदेव यादव यांच्या दिशेने बेछूट गोळीबार केला होता. त्याच्यावर राजस्थान, हरियाणा, पंजाब, गुजरातसह मुंबई व पुण्यात १७ पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. श्रीराम मांजू ऊर्फ पाचाराम बिष्णोई (२९, रा. जोधपूर, राजस्थान) हा बिष्णाई टोळीतील नामचीन गुन्हेगार आहे.

बिष्णोई टोळीतील गुंडांचे कोल्‍हापुरात आठ दिवसांपासून वास्‍तव्‍य

बिष्णोई टोळीतील गँगस्टर गुंडांचे कोल्‍हापुरात आठ दिवसांपासून वास्‍तव्‍य असल्‍याची धक्‍कादायक माहिती चौकशीत निष्‍पन्‍न झाली. त्‍या दृष्‍टीने पोलिसांनी तपासाची व्‍याप्‍ती वाढविली आहे.

खून, खंडणी वसुलीसह अपहरणसारख्या गंभीर गुन्ह्यांत फरार असलेले श्यामलाल पुनिया, श्रीराम बिष्णाेई न्यायालयीन कामकाजासाठी कोल्हापूर येथील न्यायालयात हजर राहणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळाली. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक निरीक्षक सागर वाघ, संतोष गळवे यांच्यासह विशेष पथक सकाळी न्याय संकुल आवारात दाखल झाले. चारचाकी वाहनतळात संशयितांनी आलिशान मोटार पार्क केल्याची माहिती पथकाला मिळाली.

बिष्णोई टोळीतील फरार साथीदारांच्या कोल्हापुरात मुसक्या आवळताच पिंपरी-चिंचवड पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील, श्रीनिवास कामुनी यांच्यासह राजस्थानचे पथक सायंकाळी दाखल झाले. संशयिताच्या ताब्यातील आलिशान मोटारही हस्तगत करण्यात आली. कुख्यात बिष्णोई टोळीचा गँगस्टर शामलाल पुनियासह साथीदार जेरबंद केल्‍याने पोलिस अधीक्षकांनी पोलिस पथकाचे कौतुक केले.

पोलिसांचे वेशांतर; दोन्हीही प्रवेशद्वार बंद

संशयितांकडून पथकावर कोणत्याही क्षणी जीवघेणा हल्ला होऊ शकतो, ही शक्यता गृहित धरून पथकातील पोलिसांनी कोट परिधान करून वकिलांचा वेश धारण केला. पार्किंग आवारात अधिकारी, पोलिसांची हालचाल लक्षात येताच संशयितांनी मोटारीतून पलायनाचा प्रयत्न करताच कोर्ट आवारातील दोन्हीही प्रवेशद्वार बंद करून संशयितांना नाट्यमयरीत्या जेरबंद करण्यात आले. अर्धा तास हा थरार सुरू होता. संशयितांच्या मुसक्या आवळून बंदोबस्तात मुख्यालयात नेण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news