

राशिवडे : भोगावती सहकारी साखर कारखान्यामध्ये क्रेनवरील पत्रे बदलताना तीस फूट उंचीवरुन पडून छोटल कुमार ( वय २५ )रा. थरभितीया ता.मझौलिया,पुर्वी चम्पारण्य बिहार या कामगाराचा मृत्यु झाला. ही घटना सकाळी साडे अकराच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
याबाबतची माहिती अशी की ऊसगळीत हंगाम संपल्यानंतर क्रेन सह अनेक दुरुस्त्यांच्या कामाचे टेंडर देऊन मजुरांकडून कामे करुन घेतली जातात. या उंचीवरील क्रेन दुरुस्तीचे काम एस.के.पाटील हेळेवाडी ता.राधानगरी या खाजगी ठेकेदारांनी घेतले आहे. त्यावर बिहारी काम करत होते. क्रेनच्या दुरुस्तीचे काम सुरू असतानाच तो वरून पडल्याने डोक्यावर जबर मार बसला व तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याची समजते.
या घटनेची सीपीआर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांकडून त्याला विजेचा धक्का बसून खाली पडल्याची चर्चा आहे, तर क्रेनवरील पत्रे बदलताना पाय घसरल्याचेही बोलले जात आहे. या परिसरात ठेकेदाराने अथवा कारखान्याने कोणतीही सुरक्षा व्यवस्था केल्याचे दिसून आले नाही. उंचीवर काम करताना संरक्षण म्हणून जाळी असणे आवश्यक होते. परंतू याठिकाणी जाळीच नसल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळावर असलेल्या बिहारी कुटुंबाचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.