

राशिवडे: भोगावती सहकारी साखर कारखान्यांने यंदाच्या हंगामातील पहिली उचल ३२०० रुपये प्रतिटन प्रमाणे देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. तर यासह सरकारी धोरणाप्रमाणे अंतिम दर देऊन मार्च नंतर गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला पन्नास रुपये प्रतिटन जादा देणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रा.शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजू कवडे, कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले.
पाटील म्हणाले की, कारखाना अर्थिक अडचणीत असतानाही शिस्तबध्द धोरणावर विश्वास ठेवून सभासदांसह सर्व घटकांचे सहकार्य लाभत आहे. आतापर्यत ऊसबिले, तोडणी ओढणीबिलांसह अन्य देयके अदा केली आहेत. यावर्षीसाठीही पहिली उचल ३२००रुपये प्रतिटन देत असून सरकारी धोरणाप्रमाणे उर्वरित रक्कमेसाठीही आम्ही कटिबद्ध आहोत. संचालक व कर्मचाऱ्यांनी आपला असणारा ऊस हा दुसऱ्या कारखान्यांना देणे म्हणजे या साखर कारखान्याची प्रतारणा आहे आणि म्हणूनच अन्यत्र ऊसपुरवठा करणार्या कर्मचाऱ्यांबाबत आम्ही काही कठोर निर्णय घेतले. त्याची अंमलबजावणीही केली. त्याबद्दलचा विश्वास सभासदांकडून आमच्याकडे व्यक्त होतो आहे. यंदाच्या हंगामासाठी सहा लाख टन गाळपाचे उद्दीष्ट सभासद, कर्मचारी, हिंतचिंकांच्या पाठबळावर पूर्ण करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी कारखान्याचे सेक्रेटरी उदय मोरे, ज्येष्ठ संचालक केरबा पाटील, नंदु भाऊ पाटील, मारुतराव जाधव, प्रा.ए.डी.चौगले, शिवाजी कारंडे, अभिजित पाटील आदी उपस्थित होते.