
भारत पाटणकर, ज्येष्ठ नेते
पुरोगामी चळवळींचे खंदे नेते, बहुजनांसाठी लढणारे प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी आज (दि. १७ जानेवारी, २०२२) रोजी अखेरचा श्वास घेतला. दुपारी १२ वाजता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनाही पंढरपुरातून प्रतिक्रिया दिलीय.
"ते खूप आजारी होते. पण, इतक्या लवकर ते जगाचा निरोप घेतील, असं वाट नव्हतं. मी पंढरपुरात आहे आणि ही बातमी येऊन धड़कली. या वृत्तनंतर मला मोठा धक्का बसला आहे."
'एन. डी. पाटील हे माझ्या कुटुंबाचा भाग होते. सुरूवातीच्या काळात माझे वडील क्रांतिकारी बाबुजी पाटणकर आणि आई इंदुमती पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते राहिले होते. नंतर मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे. अनेक चळवळींच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वादळ उठवण्याचं काम केलं आहे.'
पुरोगामी चळवळीत त्यांनी सत्व आणलं. चळवळीला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्राच्या पातळीवर कुणी केलं असावं, असं मला वाटत नाही. खूप मोठा माणूस मी गमावला आहे. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण होणार आहे. ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. आम्हाला सर्वांनाचं एक मोठा धक्का यामुळे बसला आहे.
त्यांनी चळवळीत अतुलनीय योगदान दिलं आहे. त्यांच्य़ा पश्चात आता त्यांचं अमूल्य कार्य पुढं नेण, हीचं त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल.
माझी आई गेली, त्यावेळी एन. डी. पाटील आजारी होते. आजारी असतानाही ते आले. ते उशीरा आले. आम्ही त्यांच्यासाठी थांबलो होतो. ते आजारी असल्याकारणाने त्यांना बाहेर जाण्यासाठी परवानगी नव्हती. तरीही ते आले. त्यावेळी एन. डी. पाटील म्हणाले होते की, 'मी इथे आलो नसतो, आयुष्यात फार मोठी चूक केली असती. मी कितीही आजारी असलो तरी 'त्या' गेल्या म्हटल्यानंतर मी येणंचं आवश्यक होतं.' ती अत्यंत हृद्य आणि डोळ्यात पाणी आणणारी आठवण आहे.
मी हायस्कूलमध्ये शिकत होतो. तेव्हापासून मी एन. डी. पाटलांना पाहिलेलं आहे. त्यांचं काम जवळून पाहिलेलं आहे. त्यांच्यासोबत वेगळ्या पध्दतीने कार्य केलं आहे. परंतु, गेल्या २५ वर्षांमध्ये महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण नियम संदर्भातील जी चळवळ आहे. यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पातळीवर त्यांचा सहसचिव म्हणून मी काम केलं आहे आणि त्यांच्यासोबत एकत्र काम करण्याचा हा सर्वात मोठा आमचा कालखंड होता.
एन डी पाटील बहुजनवादी होते. तळागाळातील लोकांविषयीची त्यांची तळमळ होती. सामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, बहुजनांसाठीविषयीची आस्था त्यांच्या कार्यातून दिसायची. श्रमिकांसाठी ते झगडले आहेत. स्त्रियांना आणि सर्व जाती-धर्माच्या लोकांना एक माणूस म्हणून जगवलं पाहिजे, असा त्यांचा विचार होता. कार्य करताना कुठला पक्ष, जात, धर्म त्यांनी पाहिले नाही. एक माणूस म्हणूनचं त्यांनी नेहमीचं त्यांच्याकडं पाहिलं.
मानवमुक्ती चळवळीचे खंदे कार्यकर्ते आपण आहोत, असं धरून ते चळवळीत उतरले होते. आणि हेचं त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे.
घरच्यांचा सहवास, त्यांचं प्रेम आणि धनसंपत्तीचा देखील त्याग एन. डी. पाटील यांनी केला होता. सर्व बंध तोडून पुरोगामी चळवळ पुढे नेण्यासाठी त्यांनी जीवनातील अनेक गोष्टी गमावल्या आहेत. इतका मोठा त्याग केवळ एन. डी. पाटीलचं करू शकतात.
– शब्दांकन : स्वालिया शिकलगार, पुढारी ऑनलाईन डेस्क