kolhapur | ‘अथर्व-दौलत’ कामगार-प्रशासन वाद अखेर मिटला

आजपासून कारखान्याचा ऊस गळीत हंगाम सुरू
Atharva Daulat Dispute Resolution
इनाम सावर्डे : बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती देताना आमदार शिवाजी पाटील. शेजारी मानसिंग खोराटे, नामदेव पाटील, अनिल शिवनगेकर, दयानंद देवण, अशोक गावडे आदी पदाधिकारी.
Published on
Updated on

चंदगड : अथर्व-दौलत साखर कारखान्याचे कामगार आणि प्रशासन यांच्यातील वादावर बुधवारी (दि. 12) सायंकाळी पडदा पडला. त्रिपक्षीय वेतन श्रेणी चार टप्प्यांत लागू करणे तसेच 102 हंगामी कामगारांना हंगाम संपण्याआधी कायम करणे या प्रमुख मागण्या अथर्व प्रशासनाकडून मान्य झाल्यानंतर गुरुवारपासून (दि. 13) अथर्व - दौलत साखर कारखान्याच्या बंद करण्यात आलेला ऊस गळीत हंगाम पुन्हा सुरू होणार आहे.

चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्या मध्यस्थीने इनाम सावर्डे (ता. चंदगड ) येथील कार्यालयात तीन तास झालेल्या बैठकीत अखेर तोडगा निघाला. यावेळी आ. पाटील, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, ‘अथर्व’चे चेअरमन मानसिंग खोराटे, भाजपचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, अनिल शिवनगेकर, पंचायत समितीचे माजी सभापती शांताराम पाटील, दौलत साखर कामगार संघटनेचे सचिव अशोक गावडे, अध्यक्ष प्रदीप पवार, उपाध्यक्ष महादेव फाटक, अथर्वचे सीईओ विजय मराठे, एचआर मॅनेजर अश्रू लाड, जनसंपर्क अधिकारी दयानंद देवण यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील हेही दिवसभर थांबून होते.

या बैठकीला दुपारपासून उपस्थित असलेले कोल्हापूर येथील कामगार नेते कॉ. उदय नारकर यांना ‘अथर्व’ प्रशासनाचा विरोध असल्याने त्यांना बैठकीबाहेरच थांबावे लागले. या बैठकीमध्ये त्रिपक्षीय वेतन श्रेणी लागू करून 2019 ते 2024 या दरम्यान असणारी 12 टक्के वेतन वाढ, 2024 ते 2019 च्या दरम्यान नव्या धोरणानुसार होणारी पगारवाढ अशा एकूण पगारवाढीचे चार टप्पे करून पहिल्या वर्षी 2500 ते 3000 रुपये इतकी वेतन वाढ आता लागू होईल. तसेच केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 1 नोव्हेंबरपासून महागाई भत्ताही लागू होणार आहे, तसेच 102 हंगामी कामगारांना हंगाम संपण्याआधी सेवेत कायम करून घेण्यास भाग पाडण्याची जबाबदारी आ. शिवाजी पाटील यांनी घेतली.

मानसिंग खोराटे म्हणाले, कारखान्यात राजकारण आणण्याचा प्रयत्न झाल्यानेच अडथळे निर्माण होत आहेत. आमदार शिवाजी पाटील यांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला. कारखाना सुरू झाला, तरच शेतकरी, वाहतूकदार, कामगार आणि चालक यांचे हित आहे. अन्यथा सर्वांचेच नुकसान आहे. माजी मंत्री भरमूअण्णा पाटील म्हणाले, कारखानाही चालला पाहिजे आणि शेतकरी कामगारही जगले पाहिजे, हा हेतू ठेवूनच सर्वांनी एकदिलाने काम करा. सर्वांनी एकत्र येऊन अडचणींवर मिळून मात करूया!

गरज पडल्यास सरकारची मदत घेऊ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेला पाठपुरावा व त्यांच्याबरोबर झालेली चर्चा याची माहिती आ. पाटील यांनी बैठकीत दिली. दौलत कारखान्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली असल्याचे सांगून या पुढील काळात कोणतीही अडचण येऊ देणार नाही. गरज पडल्यास राज्य सरकारची मदत घेऊ, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news