

Truck Tampo Accident at Murgundi Bijapur Belgaum Highway
जयसिंगपूर : विजापूर-बेळगाव महामार्गावरील मुरगुंडी (ता.अथणी) येथील ओढ्याजवळ झालेल्या विचित्र अपघातात शिरोळ तालुक्यातील दोघे व मिरज तालुक्यातील एकजण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि.१२) मध्यरात्री घडली. यात महेश सुभाष गाताडे (वय ३८, रा.गणेशवाडी, ता.शिरोळ), शिवम युवराज चव्हाण (वय २४, रा.कुटवाड, ता.शिरोळ) व सचिन विलास माळी (रा.कवलापूर, ता.मिरज, जि.सांगली) हे तिघे जागीच ठार झाल्याच्या घटनेने मध्यरात्री खळबळ उडाली. याबाबतची नोंद अथणी पोलिसांत झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिरोळ तालुक्यातील चव्हाणसह यांच्या मित्रांची कागवाड (जि.बेळगाव) येथे ऊसाची रोपवाटीका आहे. मागणीनुसार चव्हाण गाताडे व माळी हे 2 बोलेरो टॅम्पोतून उसाची रोपे घेऊन गुरुवारी रात्री विजापूरला जात होते. यावेळी विजापूरहून अथणीकडे चिरा घेऊन येणारा ट्रक आणि बोलेरो टॅम्पोमध्ये जोराची धडक होवून अपघात झाला. यात महेश गाताडे हे जागीच ठार झाले. या अपघातात शिवम चव्हाण हा स्टेरिंग व शीटमध्ये अडकून बसल्याने दुसर्या बोलेरो टॅम्पोचे ड्रायव्हर यांनी आपले वाहन बाजूला थांबवून शिवम चव्हाण याला बाहेर काढत होते. याचवेळी दुसर्या जाणार्या कारने जोराची धडक दिल्याने शिवम चव्हाण व सचिन माळी हे जागीच ठार झाले.
घटनास्थळी अथणी ग्रामीण पोलीस धाव घेवून पंचनामा केला. त्यानंतर अथणी जिल्हा उपरुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेने शिरोळ तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.