

Shivaji Peth Attack Case Suspects Paraded
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील एका तरुणावर पाठलाग करून खुनी हल्ला केल्याची घटना गुरूवारी (दि. ५) घडली होती. यावेळी तरुणाने आपला जीव वाचविण्यासाठी इमारतीवरून उडी सुद्धा घेतली होती. याच प्रकरणी ताब्यात घेतलेल्या तिघांची जुना राजवाडा पोलिसांनी आज (दि.११) धिंड काढली. शिवाय ताब्यात घेतलेल्यांना त्यांच्या परिवारासमोर अशा पद्धतीने त्यांनी परत कधीही असा प्रकार करू नये, याबाबत सिंघम स्टाईलने समज दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्व वैमनस्यातून गांधी मैदान ते खरी कॉर्नर रोडवर 5 जूनरोजी सात तरुणांनी एकाचा पाठलाग करून खुनी हल्ला केला. शिवाजी पेठेतील हर्षवर्धन उमेश मोरे हा यामध्ये जखमी झाला होता. जुना राजवाडा पोलिस ठाण्याजवळच रात्रीच्या वेळी ही थरारक घटना घडली होती. विशेष म्हणजे जीव वाचवण्यासाठी मोरे याने एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली होती. त्यानंतर मोरे याने दिलेल्या फिर्यादीनुसार ओम आवळे, मनोज उबाळे, यश माने, ऋतिक साठे, वैभव कुरणे, राज झगडे यांच्यासह एक अनोळखी व्यक्ती विरोधात जुना गुन्हा दाखल केला होता.
जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी यातील तिघांना त्यांच्या घराच्या परिसरात फिरवून सिंघम स्टाईल चांगलाच माज उतरवला. विशेष म्हणजे परिसरात अशा पद्धतीने जर मुले बिघडत असतील. तर त्यांना तात्काळ समज द्या ! एक बिघडला तर दुसरा बिघडत जातो आणि पुढे मोठ मोठ्या गुन्ह्यात ते जातात. एखाद्या वेळेस यांचा खून सुद्धा यामधून होतो, असे सांगत तरुणांना कुटुंबीय आणि शेजाऱ्यांसमोर चांगलीच समज दिली.