

पनवेल : कोल्हापूर जिल्ह्यातील आळते (ता. हातकणंगले) येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी (Ashwini Bidre Murder Case) मुख्य आरोपी आणि बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याला सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तर अन्य आरोपी महेश फाळणीकर आणि कुंदन भंडारी यांना कलम २०१ अन्वये ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, हा खटला सध्या ७ व्या वर्षी सुरू असल्याने न्यायालयाकडून त्यांना सोडण्यात आले.
अश्विनी बिद्रे हत्याकांडाच्या निकालाकडे राज्यासह पोलिस दलाचे लक्ष लागले होते. पनवेल येथील सत्र न्यायाधीश कृ. प. पालदेवार यांनी खटल्याचा निकाल दिला. पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रेचे अपहरण, हत्या, शरीराचे वूडकटरने तुकडे करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी न्यायालयाने अभय कुरुंदकरला दोषी ठरविले होते; तर साथीदार कुंदन भंडारी, महेश फाळणीकर या दोघांना पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते.
११ एप्रिलला दुपारी ३ वाजता या प्रकरणाचा निकाल होता. मात्र न्यायाधीश पालदेवार यांनी या दिवशी आश्विनीची मुलगी सिद्धी, पती राजू गोरे, वयोवृद्ध वडील जयकुमार बिद्रे, भाऊ आनंद बिद्रे यांना बाजू मांडण्याची संधी दिली. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, बचाव पक्षाचे वकील विशाल भानुशाली यांचाही यावेळी युक्तिवाद झाला. आरोपी कुरुंदकर, फाळणीकर, कुंदन भंडारी यांनाही शिक्षेबाबत विचारणा केली होती.
अखेर आज पनवेल सत्र न्यायालयाने आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बिंद्रे कुटुंबीयांना न्याय मिळाला असून, कोर्टाच्या या निर्णयामुळे समाजात एक महत्त्वपूर्ण संदेश गेला आहे. खटल्याच्या निकालासाठी बिद्रे-गोरे कुटुंबीय, आळते, हातकणंगले येथील नातेवाईक, ग्रामस्थ हजर होते.